मुंबई
ncmc card एसटी महामंडळाच्या सवलतीच्या प्रवासाचा लाभ घेणाऱ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सवलतीच्या प्रवासासाठी NCMC कार्ड अनिवार्य केल्यानंतर अनेक प्रवाशांना बायोमेट्रिक नोंदणीदरम्यान अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांचे बोटांचे ठसे जुळत नसल्याने कार्ड काढण्याची प्रक्रिया पूर्ण होत नव्हती. या तक्रारींची दखल घेत एसटी महामंडळाने आता बायोमेट्रिकऐवजी आधारशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर येणाऱ्या OTPद्वारे नोंदणी पूर्ण करण्याची सुविधा सुरू केली आहे.
महामंडळाने १ सप्टेंबरपासून महिला सन्मान योजना, ज्येष्ठ नागरिक तसेच ७५ वर्षांवरील अमृत ज्येष्ठ नागरिकांना सवलतीचा लाभ घेण्यासाठी NCMC कार्ड अनिवार्य केले आहे. एसटी बसमधून सवलतीच्या दरात प्रवास करताना याच कार्डद्वारे तिकीट काढण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, कार्ड मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या बायोमेट्रिक प्रक्रियेमुळे अनेक प्रवाशांना अडचणी येत होत्या.
विशेषतः वयोवृद्ध प्रवाशांच्या बोटांचे ठसे स्पष्टपणे नोंदवले न गेल्याने त्यांची नोंदणी रखडत होती. त्यामुळे महामंडळाने २१ सप्टेंबरपासून आधार OTPचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. बायोमेट्रिक जुळत नसल्यास आधारशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेल्या OTPच्या माध्यमातून NCMC कार्डची नोंदणी पूर्ण करता येणार आहे. या सुविधेमुळे विशेषतः अमृत ज्येष्ठ नागरिकांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, १९ सप्टेंबरपर्यंत NCMC कार्डसाठी नोंदणी न केलेल्या पात्र प्रवाशांना २५ सप्टेंबरपासून प्रत्यक्ष कार्ड वाटप सुरू करण्यात येणार आहे. कार्ड हरवले किंवा चोरीला गेले असल्यास २१ सप्टेंबरपासून ते ब्लॉक करून १९९ रुपये शुल्क भरून नवीन कार्ड घेण्याची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे.
नोंदणी पूर्ण केलेल्या प्रवाशांना सध्या QR कोड असलेली पावती देण्यात येत आहे. प्रत्यक्ष कार्ड मिळण्यास विलंब झाल्यास या पावतीच्या आधारे ३० दिवसांपर्यंत सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे. मात्र, या कालावधीत कार्ड सक्रिय करून त्यात टॉप-अप करणे बंधनकारक असेल. त्यानंतरच सवलतीचा लाभ पुढे सुरू राहणार आहे.