ग्रेटर नोएडा,
Terrible accident in Greater Noida उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे यमुना एक्स्प्रेस-वेवर धावत्या स्लीपर बसला अचानक आग लागून भीषण दुर्घटना घडली. या घटनेत आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी आगीत होरपळल्याची माहिती आहे. दुर्घटनेच्या वेळी बसमध्ये एकूण ३५ प्रवासी होते. नोएडाहून आग्र्याकडे जाणाऱ्या या डबल डेकर बसला जेवर कार्गो विमानतळाजवळ आग लागली.मिळालेल्या माहितीनुसार, नोएडापासून सुमारे ३४ किलोमीटर अंतरावर यमुना एक्स्प्रेस-वेवर ही घटना घडली. बस अचानक आगीच्या भक्ष्यस्थानी पडताच प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. काही प्रवाशांनी प्रसंगावधान राखत बसमधून बाहेर उड्या मारून आपला जीव वाचवला. मात्र काही वेळातच आगीने संपूर्ण बसला वेढले आणि आत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर पडण्यासाठी मोठी धडपड करावी लागली.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून बसमधील आग नियंत्रणात आणली. मात्र तोपर्यंत दुर्घटनेची तीव्रता वाढली होती. बसमध्ये मोठ्या प्रमाणात धूर पसरल्याने प्रवाशांना श्वास घेण्यासही त्रास होत होता. आतून बाहेर पडण्यासाठी प्रवाशांमध्ये चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण झाली होती.या दुर्घटनेतून बचावलेल्या एका महिलेने सांगितले की, ती बसमध्ये झोपलेली असताना कोणीतरी दरवाजा ठोठावून तिला उठवले. जागी झाल्यानंतर बसमध्ये मोठी गर्दी झाल्याचे तिला दिसले. परिस्थिती इतकी बिकट होती की तिने सामान घेण्याचाही प्रयत्न केला नाही. एवढेच नव्हे तर तिने चप्पलही न घालता केवळ मोबाईल घेऊन बसबाहेर पडण्याचा प्रयत्न केला. धुरामुळे काहीही दिसत नव्हते आणि बाहेर पडण्यासाठी प्रवाशांमध्ये मोठी धावपळ सुरू होती. अखेर एका व्यक्तीने तिला बाहेर ओढून काढले. तिच्यामागे अनेक प्रवासी असल्याने त्यापैकी काही जण बाहेर पडू शकले नसावेत, अशी भीती तिने व्यक्त केली.
दुसऱ्या एका प्रवाशानेही बसमधून बाहेर पडण्याचा अनुभव सांगितला. तो झोपेत असताना एका व्यक्तीने बसला आग लागल्याची माहिती देत त्याला जागे केले. त्यानंतर सर्व प्रवासी बाहेर पडण्यासाठी धावले. मात्र बसमध्ये मोठ्या प्रमाणात धूर भरल्याने बाहेर पडणे अत्यंत कठीण झाले होते. प्रवाशांनी कसाबसा मार्ग काढत बसमधून बाहेर पडल्याचे त्याने सांगितले. बस प्रवाशांनी पूर्णपणे भरलेली होती, अशी माहितीही त्याने दिली.दरम्यान, ग्रेटर नोएडामध्ये यापूर्वीही आग विझवण्याच्या कारवाईदरम्यान दुर्घटना घडली होती. त्यावेळी भिंत आणि बीम कोसळल्याने दोन अग्निशमन दलाच्या जवानांचा मृत्यू झाला होता, तर तीन जण जखमी झाले होते.