चंद्रपूर
ganesh visarjan अखेर आपल्या लाडक्या बाप्पाला शुक्रवार, 25 सप्टेंबरला निरोप देण्याची वेळ येऊन ठेपली आहे. श्री गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी चंद्रपूर शहर आणि जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेता पोलिस अधीक्षक आयुष नोपानी यांनी वाहतुकीत बदल केले आहेत.
शहरातील मुख्य विसर्जन मिरवणूक मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. प्रियदर्शिनी चौक ते जटपूरा गेट - कस्तुरबा चौक मार्गे गांधी चौक ते जटपूरा गेट मार्गे रामनगर रोड - संत केवलराम चौक ते ईरई नदी (रामसेतू पूल) पर्यंत 25 ते 26 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत वाहतूक व्यवस्था बंद राहणार आहे. तर, मुख्य विसर्जन मार्गाव्यतिरिक्त, शहरातील इतर अंतर्गत रस्त्यांवरही कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त राहणार आहे.
जटपुरा गेट ते कस्तुरबा चौक, जटपुरा गेट ते रामनगर रोड मार्गे रामसेतू पूल, जटपूरा गेट ते प्रियदर्शिनी चौक, कस्तुरबा चौक ते गांधी चौक ते जटपूरा गेट, कस्तुरबा चौक ते अंचलेश्वर गेट, गांधी चौक ते मिलन चौक ते जोडदेऊळ, कस्तुरबा चौक ते जेल रोड चौक हा परिसर नो पार्कींग-नो हॉकर्स झोन असणार आहे.
यंदा एआय कॅमेराद्वारे देखरेख
यंदा विसर्जन मिरवणुकीवर आणि गर्दीवर एआय कॅमेरांच्या माध्यमातून विशेष नजर ठेवली जाणार आहे. तसेच साध्या वेषातील पोलिस कर्मचारी आणि जलद प्रतिसाद पथके सतत गस्त घालत राहणार आहेत. आरोग्य विभागामार्फत आरोग्य पथकाच्या चमू वैद्यकीय सेवा देण्यास पूर्ण वेळ विसर्जनस्थळी राहणार आहे. जटपुरा गेट येथे गणेश मंडळांच्या स्वागतासाठी मंडप व स्टेज उभारण्यात आला आहे.
इरई नदी पात्रात विसर्जनाची तयारी
इरई नदी (रामसेतू पूल) येथे विसर्जनाकरिता मोठा कृत्रिम जलकुंड तयार करण्यात आला आहे. गणपती मंडळांनी ठरवून दिलेल्या क्रमांकाचे तंतोतंत पालन करावे व नागरिकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे तसेच नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस अधिक्षकांनी दिला आहे.