मुंबई
kayadu lohar नॅचरल स्टार नानी, सोनाली कुलकर्णी, कयाधु लोहार आणि राघव जुयाल यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘द पॅरेडाईज’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. गुरुवारी, २४ सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, प्रदर्शनापूर्वी चित्रपटाच्या प्रमोशनला वेग आला आहे. कलाकार सध्या विविध ठिकाणी चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत. नुकताच मुंबईतही प्रमोशनल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला चित्रपटातील प्रमुख कलाकार उपस्थित होते.
मात्र या कार्यक्रमात चित्रपटापेक्षा अभिनेत्री कयाधु लोहार हिच्या एका कृतीचीच अधिक चर्चा रंगली. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कयाधुने मंचावर चक्क अस्खलित मराठीत संवाद साधत मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे भरभरून कौतुक केले. तिच्या मराठी बोलण्याने उपस्थितांनाही आश्चर्याचा सुखद धक्का बसला.
मुंबईतील प्रमोशनल इव्हेंटमध्ये कयाधु गुलाबी रंगाच्या साडीत उपस्थित होती. यावेळी तिने ‘द पॅरेडाईस’मध्ये महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या सोनाली कुलकर्णी यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. सोनाली यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्याचा आनंद तिने व्यक्त केला.
कयाधुने सोनाली यांना आपल्यासाठी प्रेरणास्थान असल्याचे सांगितले. भाषा, प्रदेश आणि संस्कृतीच्या सीमा ओलांडून त्या आजही तितक्याच उत्साहाने आणि समर्पणाने काम करत असल्याचे तिने नमूद केले. भविष्यात आपल्यालाही सोनाली यांच्याप्रमाणे आत्मविश्वासाने आणि सुंदर पद्धतीने काम करायचे आहे, अशी इच्छा तिने व्यक्त केली. त्या ज्या पद्धतीने आपले काम आणि इतर जबाबदाऱ्या सांभाळतात, ते आपल्यासाठी प्रेरणादायी असल्याचेही कयाधुने सांगितले.कयाधुचे हे बोलणे ऐकून सोनाली कुलकर्णीही भावूक झाल्या. विशेष म्हणजे दाक्षिणात्य अभिनेत्रीने मराठीतून केलेल्या या कौतुकामुळे कार्यक्रमातील वातावरणही विशेष झाले.दरम्यान, कयाधुच्या या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. तिच्या मराठी उच्चारांचे आणि मराठी भाषेतून सोनाली कुलकर्णी यांचे कौतुक केल्याचे नेटकऱ्यांनी विशेष कौतुक केले. या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया आणि कमेंट्स पाहायला मिळत आहेत.
‘आमचे मराठी भैय्ये कुठे गेले कोणास ठाऊक. त्यांना दाखवा reel,’ अशी प्रतिक्रिया एका नेटकऱ्याने दिली. तर ‘हेच खरे सामर्थ्य आहे दाक्षिणात्य लोकांचे… ते भाषेचा मान राखतात,’ अशी प्रतिक्रिया देत आणखी एका नेटकऱ्याने कयाधुचे कौतुक केले. त्यामुळे ‘द पॅरेडाईस’च्या प्रदर्शनापूर्वी चित्रपटातील या प्रसंगाने सोशल मीडियावरही लक्ष वेधून घेतले आहे.