अनिल कांबळे
नागपूर,
oyo logo without permission ओयो कंपनीच्या नावाचा आणि लोगोचा अनधिकृतपणे वापर करून हॉटेल व्यवसाय चालविल्याप्रकरणी हुडकेश्वर आणि गुन्हे शाखा पोलिसांनी शहरातील तीन हॉटेल मालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. संबंधित हॉटेलचालकांनी कंपनीची परवानगी न घेता ओयो लोगोचा गैरवापर करून ग्राहकांची दिशाभूल केल्याचा आरोप आहे. ओयो कंपनीचे प्रतिनिधी नरेंद्र खारवे (पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. खुशाल विठ्ठलराव वाडेकर (विहिरगाव), चेतन मोतीराम चरडे (मातानगर, बहादुरा) आणि प्रज्वल हरिचंद्र कांबळे (दिघोरी) अशी आरोपी हॉटेलचालकांची नावे आहेत.

तक्रारीनुसार, गुन्हेशाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलिस निरीक्षक दर्शन पाटील यांच्या पथकाने हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ओयोच्या नावाखाली सुरू असलेल्या तीन हॉटेलची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित ठिकाणी कारवाई केली. यामध्ये ओयो हॉटेल ‘आनंद इन’, विहीरगाव, उमरेड रोड, ओयो हॉटेल ‘स्पॉट ऑन फक्त तू आणि मी’, माता नगर, बहादुरा तसेच ओयो हॉटेल ‘एस. के. हरी’, टेलिफोन नगर, उमरेड रोड यांचा समावेश आहे. या हॉटेलच्या मालकांकडून ओयो कंपनीची अधिकृत परवानगी नसतानाही लोगो वापरून व्यवसाय सुरू केला. त्यानुसार हॉटेल मालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली. याप्रकरणी खुशाल वाडेकर, चेतन चरडे आणि प्रज्वल कांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपींनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ओयो ब्रँड व लोगोच्या नावाखाली हॉटेल व्यवसाय सुरू केल्याचे तपासात समोर आले आहे. कंपनीच्या अधिकृत ब्रँडचा अनधिकृत वापर करून ग्राहकांमध्ये संबंधित हॉटेल ओयोशी संलग्न असल्याचा समज निर्माण होण्याची शक्यता असल्याने कंपनीकडून पोलिसांकडे तक्रार करण्यात आली.
या प्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३४५(३), ३४७(९), २२३ तसेच ट्रेड मार्क्स कायदा १९९९ मधील कलम १०३ व १०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास हुडकेश्वर पोलिसांकडून सुरू आहे.
.......
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सहपोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) राजेंद्र दाभाडे, पोलिस उपायुक्त (डिटेक्शन) दीपक अग्रवाल आणि सहायक पोलिस आयुक्त (गुन्हेशाखा) वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक दर्शन पाटील व त्यांच्या पथकातील अधिकारी आणि अंमलदारांनी ही कारवाई केली.