अर्जुनी मोरगाव,
two-girls-die-in-arjuni-morgaon जगण्याची, शिकण्याची आणि मोठे होण्याची स्वप्ने डोळ्यांत साठवलेल्या दोन चिमुकल्या विद्यार्थिनींचा अवघ्या दोन दिवसांच्या अंतराने झालेला आकस्मिक मृत्यू अर्जुनी-मोर तालुक्यासाठी अत्यंत हृदयद्रावक ठरला आहे. तालुक्यातील बुटाई नं.१ आणि मोरगाव येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये इयत्ता सहावीत शिक्षण घेणार्या ११ वर्षीय दोन मुलींचा अचानक मृत्यू झाल्याने दोन्ही गावांसह संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्दैवी घटनांमुळे पालकवर्गात चिंता व भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या मृत्यूंचे नेमके कारण काय, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बुटाई नं.१ येथील जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळेत इयत्ता सहावीत शिकणारी प्राजक्ता रंजीत उईके (११) हिची प्रकृती अचानक बिघडली. उपचारादरम्यान तिचा २३ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे २.३० वाजता दुर्दैवी मृत्यू झाला. कुटुंबीयांसाठी हा आघात इतका अनपेक्षित होता की, काही क्षणांपूर्वी घरात असलेली चिमुकली प्राजक्ता अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. या घटनेचे दुःख ताजे असतानाच मोरगाव येथील जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळेत इयत्ता सहावीत शिकणारी हिमांशी श्रीकांत पुस्तोळे (११) हिचाही २४ सप्टेंबर रोजी पहाटे सुमारे ४ वाजता अचानक मृत्यू झाला. सलग दोन दिवसांत दोन चिमुकल्या विद्यार्थिनींच्या आकस्मिक मृत्यूच्या घटना समोर आल्याने पालकवर्गाच्या चिंतेत भर पडली आहे. दोन्ही मुलींच्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, नातेवाईक व ग्रामस्थांमध्येही शोककळा पसरली आहे. शाळेच्या वर्गात आपल्या मैत्रिणींसोबत हसत-खेळत शिकणार्या या दोन्ही मुलींचे अचानक निधन झाल्याने शिक्षक, विद्यार्थी आणि पालकही व्यथित झाले आहेत.
पालकांच्या मनात अनेक प्रश्न
अल्पावधीत घडलेल्या या दोन घटनांमुळे तालुक्यातील पालकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दोन्ही मृत्यूंचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसल्याने एखादा संसर्गजन्य आजार किंवा विषाणूजन्य आजाराचा प्रादुर्भाव आहे का? याबाबत पालकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. मात्र, कोणत्याही आजाराचा किंवा विषाणूचा प्रादुर्भाव असल्याचे अधिकृत निदान अथवा पुष्टी झालेली नसताना अफवांवर विश्वास ठेवू नये, अशीही अपेक्षा व्यक्त होत आहे.
शाळांमध्ये आरोग्य तपासणीची मागणी
या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने तातडीने परिस्थितीची दखल घेऊन बुटाई नं.१, मोरगावसह तालुक्यातील शाळांमध्ये विद्याथ्र्यांची आरोग्य तपासणी मोहीम राबवावी तसेच आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पालकवर्गातून होत आहे.