महोबा
uttar pradesh crime केवळ ६० रुपये देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून मुलाने आईवर कुऱ्हाडीने हल्ला करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात घडली. या प्रकरणी मोहन यादव (२८) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मृत महिलेचे नाव मूला देवी (५१) असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांच्या माहितीनुसार, मोहनला गांजाचे व्यसन असल्याचे समोर आले आहे. नशेसाठी पैसे मिळावेत म्हणून तो आईकडे वारंवार पैशांची मागणी करत असल्याचे सांगण्यात आले. घटनेच्या दिवशीही त्याने आईकडे ६० रुपयांची मागणी केली. मात्र, घरात पैसे नसल्याने मूला देवी यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला आणि रागाच्या भरात मोहनने घरातील कुऱ्हाड उचलून आईच्या मानेवर अनेक वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात मूला देवी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
हल्ल्यानंतरही मोहन घटनास्थळावरून निघून गेला नाही. तो काही काळ आईच्या मृतदेहाजवळच बसून राहिल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, मूला देवी यांचा मुलगा सोहन यादव पत्नीला नोएडाला सोडून गावी परतला होता. तो घरी पोहोचला असता त्याला आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. त्यानंतर त्याने आरडाओरड केल्याने शेजारी आणि ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले.
ग्रामस्थांनी पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मोहनला ताब्यात घेतले असून घटनास्थळावरून आवश्यक पुरावे जमा केले आहेत. मूला देवी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.