मुंबई
wpl 2027 महिला प्रीमियर लीगच्या २०२७ हंगामासाठी सर्व फ्रँचायझींनी तयारी सुरू केली असतानाच मुंबई इंडियन्सने आपल्या महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदावर महत्त्वाचा बदल केला आहे. आगामी हंगामाच्या लिलावापूर्वी फ्रँचायझीने अनुभवी प्रशिक्षक ल्यूक विल्यम्स यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
मागील हंगामात मुंबई इंडियन्सच्या महिला संघाचे मुख्य प्रशिक्षकपद लिसा कीटली यांच्याकडे होते. मात्र, त्यांनी क्रिकेट ऑस्ट्रेलियामध्ये ‘हेड ऑफ नॅशनल डेव्हलपमेंट’ ही जबाबदारी स्वीकारण्यासाठी प्रशिक्षकपद सोडले. त्यांच्या जागी आता ल्यूक विल्यम्स यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विल्यम्स यांना WPLमधील प्रशिक्षकपदाचा यशस्वी अनुभव असून २०२४ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या महिला संघाने पहिले WPL विजेतेपद पटकावले, त्यावेळी ते संघाचे मुख्य प्रशिक्षक होते.
मुंबई इंडियन्समध्ये दाखल झाल्यानंतर विल्यम्स यांनी नव्या जबाबदारीबद्दल उत्साह व्यक्त केला. मुंबई इंडियन्ससारख्या प्रतिष्ठित फ्रँचायझीसोबत काम करण्याची संधी मिळाल्याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले. प्रतिभावान खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसोबत मिळून आक्रमक आणि रोमांचक क्रिकेट खेळत विजेतेपदासाठी आव्हान निर्माण करण्याचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ल्यूक विल्यम्स यांचा प्रशिक्षक म्हणून अनुभवही उल्लेखनीय आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ॲडलेड स्ट्रायकर्सने २०२२ आणि २०२३ मध्ये सलग दोन वेळा महिला बिग बॅश लीगचे (WBBL) विजेतेपद पटकावले. याशिवाय, २०२३ मध्ये ‘द हंड्रेड’ महिला स्पर्धा जिंकणाऱ्या सदर्न ब्रेव्ह संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये सहाय्यक प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी काम केले आहे.मुंबई इंडियन्समध्ये रुजू झाल्यानंतर विल्यम्स यांच्यासमोर पहिले मोठे आव्हान असेल ते म्हणजे आगामी हंगामासाठी संघाची रिटेन्शन लिस्ट निश्चित करणे. कायम ठेवण्यात येणाऱ्या खेळाडूंची अंतिम यादी सादर करण्यासाठी २८ सप्टेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर २८ ऑक्टोबर रोजी कोची येथे WPL 2027 चा मिनी-लिलाव होणार आहे. आगामी हंगाम १४ जानेवारी ते ७ फेब्रुवारी या कालावधीत खेळवला जाणार आहे.
मुंबई इंडियन्सने आतापर्यंत दोन वेळा WPLचे विजेतेपद पटकावले आहे. मात्र, मागील हंगाम संघासाठी अपेक्षेप्रमाणे राहिला नाही. केवळ तीन विजयांसह संघाला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्यामुळे नव्या प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली संघाच्या कामगिरीत सुधारणा करण्याचे आव्हान मुंबई इंडियन्ससमोर असणार आहे. आगामी लिलावात कोणत्या खेळाडूंना कायम ठेवले जाते आणि संघाच्या रचनेत कोणते बदल केले जातात, याकडे आता क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.