नागपूर
young-lawyer-commits-suicide ‘आई-बाबा मला माफ करा. मी तुमची अपेक्षा पूर्ण करु शकलो नाही. माझ्या बहिणीकडे लक्ष द्या, तिला शिक्षणापासून वंचित ठेवू नका’ असे सुसाईड नोटमध्ये लिहून यवतमाळ जिल्ह्यातून नागपुरात प्रॅक्टिस करायला आलेल्या एका युवा वकिलाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज दुपारी उघडकीस आली. दादाजी नियोजित किनकर (२५) असे मृत वकिलाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दादाजी किनकर यांनी यवतमाळमधून एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर वकिलीची प्रॅक्टीस करण्यासाठी नागपुरात आले होते. त्यांनी फुटाळा परीसरात भाड्याने रुम घेतली. तेथे एकटेच राहत होते. एका नामांकित वकिलाच्या कार्यालयातून त्यांनी वकिली व्यवसाय सुरु केला होता. गेल्या काही दिवसांपासून ते तणावात दिसत होते. मात्र, कार्यालयातील इतर ज्युनिअर वकिलांच्या ते लक्षात आले नाही. बुधवारी रात्री दादाजी यांनी जेवण केले आणि झोपले. मध्यरात्रीच्या सुमारास दादाजी यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. दुसऱ्या दिवशी आईने दादाजी यांना फोन केला असता प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे तिने ही बाब पतीला सांगितली. दोघांनीही अनेकदा मुलाला फोन केले. मात्र, दादाजी फोन उचलत नव्हता. त्यामुळे त्यांनी घरमालक महिलेला फोन केला. तिने खोलीत डोकावून बघितले असता दादाजी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. तिने लगेच दादाजीच्या आईवडिलांना माहिती दिली.
अंबाझरीचे ठाणेदार विनोद गोडबोले यांनी लगेच मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी अंबाझरी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मात्र, दादाजी यांनी आत्महत्या नेमक्या कोणत्या कारणाने केली, याबाबत चौकशी सुरु आहे.