मुंबई
ukraine war संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत संबोधित करताना युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष यांनी रशियावर गंभीर आरोप केले आहेत. युक्रेनविरोधातील युद्धासाठी रशिया भारतासह तब्बल ४७ देशांतील नागरिकांचा वापर करत असल्याचा दावा त्यांनी केला. परदेशी नागरिकांशी रशिया कथितरीत्या कशा प्रकारे गैरवर्तन करीत आहे आणि त्यांना युद्धभूमीवर कशा पद्धतीने पाठवले जात आहे, याची संबंधित देशांना जाणीव असल्याचे सांगत झेलेन्स्की यांनी या देशांच्या सरकारांनी आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने पावले उचलावीत, असे आवाहन केले.
रशिया आर्थिकदृष्ट्या कमकुवत देशांमधील नागरिकांना नोकरीच्या आमिषाने आकर्षित करीत असल्याचा आरोप युक्रेनकडून करण्यात आला आहे. सुरक्षा रक्षक, बांधकाम कामगार, लॉजिस्टिक्स कर्मचारी तसेच चालक अशा विविध पदांवर आकर्षक वेतनाची नोकरी देण्याचे आश्वासन या नागरिकांना दिले जाते. मात्र, रशियात पोहोचल्यानंतर त्यांच्यावर रशियन लष्कराशी संबंधित करारांवर स्वाक्षरी करण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानंतर पुरेसे लष्करी प्रशिक्षण न देता या नागरिकांना थेट युद्धभूमीवर पाठवले जात असल्याचेही युक्रेनचे म्हणणे आहे.
भारत, नेपाळ, घाना, क्युबा, झिम्बाब्वे, येमेन, केनिया, बेलारूस, सुदान, दक्षिण आफ्रिका आणि ताजिकिस्तान यांसह विविध देशांतील नागरिक रशियन लष्करी तुकड्यांमध्ये तैनात असल्याचा दावा झेलेन्स्की यांनी केला. त्यामुळे संबंधित देशांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन आपल्या नागरिकांच्या संरक्षणासाठी आवश्यक ती पावले उचलण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
झेलेन्स्की यांच्या भाषणात भारताचा विशेष उल्लेख झाला असला, तरी रशियन सशस्त्र दलात दाखल झालेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षित सुटकेसाठी भारत सरकार रशियाशी सातत्याने संपर्कात आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी यापूर्वी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, रशियन सशस्त्र दलात २२७ भारतीय नागरिक भरती झाल्याची नोंद भारत सरकारकडे होती. यापैकी १३९ भारतीयांची रशियन लष्करी सेवेतून सुटका करण्यात यश आले आहे. मात्र, या युद्धात ५१ भारतीय नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहितीही समोर आली आहे. उर्वरित भारतीय नागरिकांची सुरक्षित सुटका करून त्यांना मायदेशी परत आणण्यासाठी भारताकडून रशियन प्रशासनाशी राजनैतिक पातळीवर सातत्याने पाठपुरावा केला जात आहे.
या प्रकरणाची चिंता भारतापुरती मर्यादित नसून इतर अनेक देशांनीही रशियन सैन्यात आपल्या नागरिकांच्या भरतीबाबत चिंता व्यक्त केली आहे. युक्रेनमध्ये ६२ घानावासीयांचा मृत्यू झाला असून आणखी १५ जण बेपत्ता असल्याची माहिती समोर आल्यानंतर घाना सरकारने मॉस्कोला आपल्या नागरिकांची रशियन सैन्यातील भरती तातडीने थांबवण्याचे कठोर निर्देश दिले आहेत.
दरम्यान, रशिया आणि उत्तर कोरिया यांच्यातील वाढत्या लष्करी सहकार्याचाही झेलेन्स्की यांनी उल्लेख केला. उत्तर कोरियाचे सैनिक रशियन सैन्याला मदत करण्यासाठी युद्धक्षेत्रात तैनात करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे रशिया-युक्रेन युद्धाचा व्याप आणि त्यात सहभागी होणाऱ्या परदेशी नागरिक व सैन्यदलांचा प्रश्न पुन्हा आंतरराष्ट्रीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.आपल्या भाषणाच्या अखेरीस झेलेन्स्की यांनी संबंधित सर्व देशांच्या सरकारांना त्यांच्या नागरिकांची बेकायदेशीर पद्धतीने होत असलेली भरती तातडीने तपासण्याचे आवाहन केले. नोकरीचे खोटे आश्वासन देऊन नागरिकांना रशियात नेणे आणि त्यानंतर त्यांना युद्धभूमीवर पाठवणे या कथित प्रकारामागे कार्यरत असलेल्या मानवी तस्कर, एजंट आणि त्यांच्या नेटवर्कवर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. रशियन सैन्यात अडकलेल्या परदेशी नागरिकांची शक्य तितक्या लवकर सुटका करून त्यांना त्यांच्या मायदेशी परत आणण्यासाठी संबंधित सर्व देशांनी परस्पर समन्वयाने ठोस पावले उचलावीत, असे आवाहनही झेलेन्स्की यांनी केले.