हनुमंताची भव्य मूर्ती, भगवे ध्वज अन् किल्ल्याची पार्श्वभूमी

‘बजरंगी’च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता

    दिनांक :26-Sep-2026
Total Views |
मुंबई
siddharth jadhav आगामी मराठी चित्रपट ‘बजरंगी’चे दमदार पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले असून, त्यातील भव्य दृश्यरचनेने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. विराट हनुमंताची मूर्ती, तिच्यासमोर पाठ करून उभा असलेला तरुण, फडकणारे भगवे ध्वज आणि मागे दिसणारा किल्ला, अशी पोस्टरची मांडणी आहे. आकाशात पसरलेला सोनेरी प्रकाश या संपूर्ण दृश्याला सिनेमॅटिक रूप देतो. पोस्टरमधून चित्रपटाच्या कथेला गूढ आणि रहस्यमय पार्श्वभूमी असल्याचे संकेत मिळत असले तरी निर्मात्यांनी कथानकाचा फारसा उलगडा केलेला नाही.
 

bajrangi marathi movie poster revealed, siddharth jadhav to appear in a unique role 
पोस्टरच्या मध्यभागी विराट रूपातील हनुमंताची मूर्ती ठळकपणे दिसते. तिच्यासमोर हातात भगवा कपडा घेतलेला एक तरुण उभा आहे. एका बाजूला हनुमंताचे भव्य रूप, तर दुसरीकडे किल्ला आणि भगवे ध्वज, यामुळे पोस्टरला प्रभावी दृश्यात्मकता प्राप्त झाली आहे. या दृश्यरचनेतून संबंधित तरुणाच्या आयुष्यात घडणाऱ्या एखाद्या महत्त्वपूर्ण आणि अनपेक्षित घटनेची चाहूल लागते.
मात्र हा तरुण नेमका कोण आहे, त्याचा हनुमंताशी काय संबंध आहे, त्याच्या आयुष्यात कोणता प्रसंग घडतो आणि किल्ला व या संपूर्ण पार्श्वभूमीचा कथेशी काय संबंध आहे, याचे उत्तर अद्याप गुलदस्त्यात आहे. पोस्टरमधून काही संकेत देतानाच कथानकाची उत्सुकता कायम ठेवण्याची भूमिका निर्मात्यांनी घेतली आहे.
चित्रपटात ‘बजरंगी’ची प्रमुख भूमिका अभिनेता सिद्धार्थ जाधव साकारणार आहे. या भूमिकेतून तो एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांसमोर येणार असून, त्याच्या व्यक्तिरेखेचा कथानकाला नेमका कोणता टर्निंग पॉइंट मिळणार, याची उत्सुकता आहे.
‘बजरंगी’चे siddharth jadhav दिग्दर्शन तेजस लोखंडे यांनी केले असून, चित्रपटाचे लेखन हेमंत एदलाबादकर यांनी केले आहे. अवंतिका सिने एंटरप्राइजेस या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. पोस्टरमधून कथेचे काही महत्त्वाचे धागेदोरे समोर आले असले तरी व्यक्तिरेखांचा प्रवास आणि या रहस्यमय पार्श्वभूमीमागची संपूर्ण कथा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच उलगडणार आहे.चित्रपटाविषयी दिग्दर्शक तेजस लोखंडे यांनी सांगितले की, ‘बजरंगी’ची सुरुवात अशा एका प्रसंगातून होते, जो स्वतःच अनेक प्रश्न उपस्थित करतो. श्रद्धा आणि अविश्वास यांच्या कात्रीत सापडलेल्या एका व्यक्तीचा हा प्रवास आहे. या प्रवासादरम्यान त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या अनपेक्षित घटनांमधून कथा पुढे सरकते. पोस्टरद्वारे कथानक उघड न करता प्रेक्षकांची उत्सुकता वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. चित्रपटाची कथा प्रेक्षकांना वेगळा अनुभव देईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.