40 दुकाने आणि पाच रुग्णालयांना घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत नोटीस

रुग्णालयातील निरुपयोगी कचरा, रक्त नमुने रस्त्यावर

    दिनांक :26-Sep-2026
Total Views |
भंडारा,
discarded-hospital-waste घनकचरा व्यवस्थापना अंतर्गत व्यापारी प्रतिष्ठान आणि दवाखान्यांमधील कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावता रस्त्यावर फेकून दिल्या प्रकरणी 40 व्यापारी प्रतिष्ठाने आणि 5 रुग्णालयांना भंडारा नगरपालिकेने नोटीस बजावली आहे. व्यापारी प्रतिष्ठान प्रत्येकी 5 हजार आणि रुग्णालयांना 10 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
 
 
discarded-hospital-waste
 
घनकचरा व्यवस्थापन नियमांतर्गत व्यापारी प्रतिष्ठाने, रुग्णालय यांनी त्यांच्या प्रतिष्ठानात आणि रुग्णालयात तयार होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने स्वतःची कचराकुंडी ठेवून नंतर ती नगरपालिकेच्या घंटागाडीत टाकणे अपेक्षित आहे. या नियमांचे पालन व्हावे यासाठी अनेकांना यापूर्वी नोटीसही बजावण्यात आल्या आहेत. मात्र आज नगरपालिकेचे मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांच्या नेतृत्वात राबविण्यात आलेल्या मोहिमेत 40 व्यापारी प्रतिष्ठाने आणि आठ रुग्णालय, प्रयोगशाळांना कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावता रस्त्यावर फेकून दिल्या प्रकरणी नोटीस देत दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. रुग्णालयाकडून आणि पॅथॉलॉजी कडून रुग्णालयातील निरुपयोगी कचरा, रक्ताचे नमुने फेकून देण्यात आले होते. त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली. यात इंद्राक्षी आय हॉस्पिटल, लांजेवार हॉस्पिटल मिस्किन टॅंक, देशकर हॉस्पिटल, बावनकर पॅथॉलॉजी, एस. पी. पॅथॉलॉजी, श्लोक हॉस्पिटल, विनय सोनोग्राफी यांचा समावेश आहे.
 
 
व्यापाऱ्यांना प्रत्येकी 5 हजार असा एकूण 2 लाख व रुग्णालयांना दहा हजार रुपये याप्रमाणे दंड करण्यात आला. नोटीस मिळाल्यापासून सात दिवसाच्या आत दंडाची रक्कम न भरल्यास फौजदारी कारवाई करण्याचा इशारा नोटीस मधून दिला आहे. या कारवाईत मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांच्या मार्गदर्शनात स्वच्छता अभियंता निखिल तट्टे, मोहन वासनिक, मनोज वंजारी, धीरज राणे, प्रशांत मेश्राम, संदीप मेश्राम यांच्यासह इतर कर्मचारी सहभागी झाले होते.
 
शहरातील सर्व व्यावसायिकांनी घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी सहकार्य करावे. रस्त्यावर कचरा फेकणे गुन्हा असून तो करताना आढळल्यास कारवाई करण्यात येईल. विशेष करून रुग्णालयातील निरुपयोगी साहित्य रस्त्यावर फेकून प्रदूषणात वाढ करू नये असे आवाहन नगरपालिकेचे मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी केले आहे.