२१०० विद्यार्थ्यांच्या कंठातून ‘वंदे मातरम’चा सामूहिक निनाद

भारत विद्यालयात आयोजन

    दिनांक :26-Sep-2026
Total Views |
हिंगणघाट,
bharat-vidyalaya विद्या भारती अखिल भारतीय शिक्षा संस्थान, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार ‘वंदे मातरम्’ च्या १५० व्या वर्षानिमित्त ‘नमामि भारतम्’ उपक्रमांतर्गत देशभरात शुक्रवारी सकाळी ११ वाजता सामूहिक वंदे मातरम् गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून स्थानिक भारत विद्यालयात २५ रोजी सकाळी ११ वाजता सामूहिक वंदे मातरम् गायन उत्साहात संपन्न झाले.
 
 
bharat-vidyalaya
 
या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार म्हणून तरुण भारतचे पत्रकार सतीश वखरे, प्रोग्रेसिव्ह एज्यूकेशन सोसायटीचे सदस्य तसेच मुख्याध्यापक हरीश भट्टड, उपमुख्याध्यापक मनीषा कोंडावार, पर्यवेक्षक निलाक्षी बुरीले, सिंधू नंदनवार, विद्यालयातील ६५ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तथा पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी २१०० विद्यार्थ्यांनी एका लयीत, एका स्वरात वंदे मातरम्चे सामूहिक गायन करून राष्ट्रभतीचा जागर केला. कार्यक्रमस्थळी विद्या भारती, नमामि भारतम्, वंदे मातरम् सामूहिक गायन, २५ सप्टेंबर २०२६ या शब्दावलीचा फलक लावण्यात आला होता.
 
 
याप्रसंगी पत्रकार सतीश वखरे म्हणाले, वंदे मातरम हे कोणत्याही जाती-धर्माच्या विरुद्ध असलेले गीत नाही. या गीतात फत भारत मातेच्या वैभवाचे वर्णन आहे. सुजलाम्, सुफलाम्, श्यामलाम् म्हणजे ही भूमी चांगले जल देणारी, चांगली फळे-फुले देणारी आणि शेतीने हिरवीगार झालेली आहे. शुभ्र ज्योत्स्ना पुलकित यामिनी म्हणजे चांदण्याने उजळलेली रात्र असलेली ही भूमी आहे. पुढे यातच भारत मातेला दुर्गा म्हटले आहे. कारण ती दशप्रहरणधारिणी म्हणजे शस्त्रसज्ज आहे. तिला कमला म्हटले आहे, म्हणजे ती समृद्धी देणारी लक्ष्मी आहे आणि वाणी म्हणजे विद्या देणारी सरस्वती आहे. थोडयात शौर्य, समृद्धी आणि विद्या यांचा संगम म्हणजे भारत भूमी. या पवित्र गीतावर काही विकृत मनोवृत्तीच्या लोकांनी बंदी आणण्याचा प्रयत्न केला. पण, आता भारत सरकारने पूर्ण वंदे मातरम् गायले पाहिजे, असा निर्णय घेतला आहे, असेही ते म्हणाले. कार्यक्रमात वंदे मातरम्ची महती कार्यक्रमाचे संयोजक रणदीप बिसने यांनी मांडली. कार्यक्रमाचे अध्यक्ष बळीराम चव्हाण यांनीही मार्गदर्शन केले.