नवी दिल्ली,
Indian Women's Kabaddi Team Wins Gold भारतीय महिला कबड्डी संघाच्या वाघिणींनी अंतिम सामन्यात इराणचा पराभव करत सुवर्णपदक आपल्या नावावर केले आहे. हा सामना अतिशय अटीतटीचा आणि श्वास रोखणारा ठरला. एशियन गेम्समध्ये भारताचे कबड्डीमधील हे चौथे सुवर्णपदक असून, भारताने हा थरारक सामना ३७-३४ च्या फरकाने जिंकला.सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये भारताने २२-१६ अशी ६ गुणांची भक्कम आघाडी घेतली होती. मात्र, दुसऱ्या हाफमध्ये इराणच्या संघाने जोरदार पुनरागमन करत भारताची ही आघाडी मोडून काढली. इराणने अंतर कमी करत २७-२६ अशी केवळ १ गुणाची स्थिती निर्माण केली, ज्यामुळे सामना संपायला ८ मिनिटे बाकी असताना भारतीय संघावर मोठा दबाव निर्माण झाला होता.
जेव्हा सामना अवघ्या १ गुणाच्या अंतरावर येऊन ठेपला, तेव्हा पूजा हथवालाने आक्रमक खेळ करत एकापाठोपाठ एक यशस्वी रेड्स करून संघासाठी मोलाची गुणांची कमाई केली. भारताने या हाफमध्ये एकूण १५ गुण मिळवले, ज्यामध्ये पूजाचे योगदान अतिशय महत्त्वाचे ठरले. पूजाने सलग गुण घेतल्यानंतर भारतीय बचावानेही उत्कृष्ट खेळ करत इराणच्या रेडर्सना बाद केले. या सामूहिक कामगिरीमुळे भारताने इराणच्या कमबॅकला ब्रेक लावला आणि अखेर ३७-३४ असा विजय साकारत सामना आपल्या बाजूने खेचून आणला.एशियन गेम्समध्ये २०१० साली महिला कबड्डीचा समावेश झाल्यापासून भारतीय संघाने आपले निर्विवाद वर्चस्व कायम ठेवले आहे. आतापर्यंत झालेल्या पाचही मोसमांत भारताने प्रत्येक वेळी अंतिम फेरीत धडक मारत पदक जिंकण्याचा अभूतपूर्व विक्रम केला आहे, ज्यामध्ये आता चार सुवर्ण आणि एका रौप्य पदकाचा समावेश आहे. या ऐतिहासिक प्रवासाची सुरुवात २०१० च्या गुआंगझोऊ एशियन गेम्समध्ये झाली, जिथे भारताने थायलंडचा २८-१४ असा एकतर्फी पराभव करत पहिले सुवर्णपदक पटकावले होते.
यावानंतर २०१४ च्या इंचियोन एशियन गेम्समध्ये भारतीय महिलांनी इराणला ३१-२१ असे नमवून सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. मात्र, २०१८ च्या जकार्ता एशियन गेम्समध्ये इराणने भारताच्या सुवर्ण मोहिमेला ब्रेक लावला; अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या त्या सामन्यात भारताला २४-२७ असा पराभव पत्करावा लागल्यामुळे रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते. हा पराभव मागे टाकत २०२३ मध्ये हांगझोऊ येथे झालेल्या एशियन गेम्समध्ये भारतीय संघाने जोरदार पुनरागमन केले आणि अंतिम सामन्यात चीनी ताइपेचा २६-२५ असा अवघ्या एका गुणाच्या फरकाने थरारक पराभव करत पुन्हा सुवर्णपदक जिंकले. हाच विजयी रथ कायम ठेवत २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय रणरागिणींनी पारंपरिक प्रतिस्पर्धी इराणला ३७-३४ असे धूळ चारली आणि चौथे ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकून आशिया खंडात भारताचे नाव पुन्हा एकदा सुवर्णाक्षरांनी कोरले.