नवी दिल्ली,
Mandeep K Bhandari new head of CBSE केंद्रीय केंद्र सरकारने २०२१ च्या बॅचचे आयएएस अधिकारी मंदीप के भंडारी यांची केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या म्हणजेच सीबीएसईच्या नवीन चेयरपर्सनपदी नियुक्ती केली आहे. मंदीप के भंडारी हे सध्या जम्मू-काश्मीरच्या उपराज्यपालांचे प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणून महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहेत. विशेष म्हणजे, प्रशासकीय सेवेत पाऊल ठेवण्यापूर्वी त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेत एमबीबीएसची पदवी संपादन केली होती.मंदीप के भंडारी यांचा जन्म १४ सप्टेंबर १९७४ रोजी झाला. त्यांनी पंजाब विद्यापीठाशी संलग्न असलेल्या लुधियाना येथील दयानंद मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या शैक्षणिक प्रवासात त्यांना सुवर्णपदक देखील मिळाले होते. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी डॉक्टर म्हणून करिअर न करता थेट प्रशासकीय सेवेत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण करत एजीएमयूटी कॅडरची निवड केली आणि ते २००१ च्या बॅचचे आयएएस अधिकारी बनले.
आयएएस अधिकारी झाल्यानंतर मंदीप के भंडारी यांनी जम्मू-काश्मीरमध्ये अनेक पदांवर उत्कृष्ट सेवा बजावली. सुरुवातीच्या काळात त्यांनी बडगाममध्ये एसडीएम, कठुआमध्ये एडिशनल डेव्हलपमेंट कमिश्नर आणि लेह व जम्मूमध्ये डेप्युटी कमिश्नर म्हणून काम पाहिले. त्यांनी श्री माता वैष्णो देवी श्राइन बोर्डात एडिशनल सीईओ म्हणूनही जबाबदारी सांभाळली. याशिवाय, जम्मूचे डिव्हिजनल कमिश्नर आणि जम्मू-काश्मीर सरकारच्या हेल्थ अँड मेडिकल एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये कमिश्नर सेक्रेटरी पदही त्यांनी भूषवले. या काळात त्यांना जिल्हा प्रशासन, विकासकामे आणि आरोग्य व शिक्षणाशी संबंधित कामांचा दांडगा अनुभव मिळाला.
मंदीप के भंडारी यांचा अनुभव केवळ जम्मू-काश्मीरपुरता मर्यादित नसून त्यांनी केंद्रातही मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. जानेवारी ते सप्टेंबर २०१८ या काळात त्यांनी तत्कालीन केंद्रीय मानवी संसाधन विकास मंत्र्यांचे प्रायव्हेट सेक्रेटरी म्हणून काम केले. त्यानंतर सप्टेंबर २०१८ ते जानेवारी २०२३ पर्यंत त्यांनी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयात सहसचिव म्हणून सेवा दिली. यामुळे त्यांना केंद्र सरकार स्तरावर आरोग्य आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित मंत्रालयांमध्ये काम केल्याचा मोठा अनुभव आहे.मार्च २०२३ पासून ते जम्मू-काश्मीरच्या उपराज्यपालांचे प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणून कार्यरत आहेत. तसेच त्यांना श्री अमरनाथ जी श्राइन बोर्डाच्या सीईओपदाचा अतिरिक्त कार्यभारही देण्यात आला होता. २०२६ मध्ये त्यांची केंद्रात अतिरिक्त सचिव पदांसाठी निवड करण्यात आली होती. आता केंद्र सरकारने मंदीप के भंडारी यांच्याकडे सीबीएसईच्या प्रमुखपदाची मोठी धुरा सोपवली आहे. त्यांच्या या नियुक्तीला कॅबिनेटच्या अपॉइंटमेंट कमिटीने मंजुरी दिली असून २५ सप्टेंबर रोजी त्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. ते लोखंडे प्रशांत सीताराम यांची जागा घेणार आहेत, जे यापूर्वी सीबीएसई चेयरपर्सनचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत होते. आता मंदीप के भंडारी सीबीएसईचे पूर्णवेळ प्रमुख म्हणून आपला पदभार स्वीकारणार आहेत.