मुंबई
manoj jarange patil मराठा समाजाला इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीवरून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची भूमिका जाहीर केली आहे. काही आठवड्यांपूर्वी अंतरवाली सराटी येथे उपोषणाला सुरुवात केल्यानंतर त्यांनी मुंबईत आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त केला होता. मात्र, मुंबईतील उपोषणाला परवानगी नसतानाही मुंबईकडे जाण्याचा निर्णय त्यांनी कायम ठेवला होता. सलग १८ दिवसांच्या उपोषणामुळे प्रकृती खालावल्याने बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे त्यांना उपोषण स्थगित करावे लागले होते. आता सरकारला दिलेल्या तीन महिन्यांच्या कालावधीनंतर पाटोद्यापासून पुढे मुंबईत आंदोलन करण्याची घोषणा जरांगे यांनी केली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्यानंतर सरकारमधील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत त्यांचे उपोषण मागे घेण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी सरकारला ९० दिवसांचा अवधी दिला होता. सरकारकडूनही जरांगे यांच्या अनेक मागण्या पूर्ण केल्याचा दावा करण्यात आला. मात्र, ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षणाची अंमलबजावणी अपेक्षित पद्धतीने होत नसल्याचा आरोप जरांगे यांनी सातत्याने केला. याच पार्श्वभूमीवर त्यांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला असून जात पडताळणी समिती रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. सरकारमधील अनेक नेत्यांनी या मागणीला विरोध केला असला तरी विविध मागण्यांसह ओबीसीतून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जरांगे ठाम आहेत.
माध्यमांशी संवाद साधताना जरांगे यांनी आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट केली. “आमची लढाई सुरू आहे. माझं शरीर उपोषणाचं राहिलं देखील नाही. रस्त्यावरील लढाई करतो,” असे त्यांनी सांगितले. अंतरवाली सराटी आणि मराठा समाजाचे समीकरण कधीही सुटणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. आता अंतरवाली सराटी येथे आंदोलन केले जाणार नसून तेथील आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. आंदोलनाचा प्रवास पाटोद्यापर्यंत पोहोचला असून पुढील टप्प्यात मुंबईकडे जाण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
अंतरवाली सराटी येथील manoj jarange patil आंदोलनादरम्यान स्थानिकांनी दिलेल्या सहकार्याचाही जरांगे यांनी उल्लेख केला. “तेथील लोकांनी रक्त सांडलं. तेथील ओबीसी बांधवांनी वावर देखील दिले. मराठा समाज कधीच विसरणार नाही,” असे ते म्हणाले. गेल्या तीन वर्षांपासून आरक्षणासाठी संघर्ष सुरू असल्याचे सांगत आंदोलन पाटोद्यापर्यंत पोहोचले आहे, असेही त्यांनी नमूद केले.
सरकारला दिलेला तीन महिन्यांचा अवधी संपल्यानंतर आंदोलनाचा पुढील टप्पा मुंबईत असेल, असे जरांगे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.