अनैतिक संबंधाच्या संशयातून तिसऱ्या पत्नीची हत्या

- नागपुरातील ऑटोचालक पतीला अटकेत

    दिनांक :26-Sep-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर
nagpur crime पत्नीची ठाण्यात हत्या करून नागपुरात परतलेल्या अजनीतील ऑटोचालकाला ठाणे गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासांत पाचपावली परिसरातून अटक केली. अमोल दिलीप वाघमारे (४५, रा. अजनी) असे आरोपीचे नाव असून, त्याचा साथीदार कृपाल किशोर भैसारे (३१, रा. नागपूर) यालाही पोलिसांनी अटक केली आहे. दोघांनाही ठाण्यातील कासारवडवली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाबुराव राऊत यांच्या पथकाने केली.
 

nagpur crime  
पोलिसांच्या माहितीनुसार, अमोल आणि त्याची पत्नी सावित्री अमोल वाघमारे (४०) यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरू होता. कौटुंबिक वादातून सावित्री अजनीतील घर सोडून ठाण्यात गेली होती. तिला परत नागपुरात आणण्यासाठी अमोल ठाण्यात गेल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. ठाण्यात गेल्यानंतर दोघांमध्ये पुन्हा जोरदार वाद झाला. याच वादातून अमोलने साथीदार कृपालच्या मदतीने सावित्रीवर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात सावित्रीच्या मान, डोक्यावर तसेच पाठीवर गंभीर जखमा झाल्या. त्यानंतर दोघेही घटनास्थळावरून पसार झाले. २२ सप्टेंबर रोजी ठाणे पश्चिमेतील पाटलीपाडा परिसरातील एका घरात सावित्रीचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी कासारवडवली पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

तांत्रिक तपासातून नागपुरात माग काढला
गुन्हे शाखेने आरोपी नागपुरात परतल्याचे शोधून काढले. पोलिसांचे पथक नागपुरात दाखल झाले. अमोलचा माग काढत पोलिसांनी पाचपावली परिसर गाठला. ठाण्याहून परतल्यानंतर अमोल पुन्हा ऑटो चालवण्याचे काम करू लागल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पाचपावली परिसरातून अमोल आणि कृपालला ताब्यात घेण्यात आले. दोघांना अजनी पोलिस ठाण्यात आणून पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ट्रान्झिट रिमांडवर ठाण्यात नेण्यात आले.
पत्नीचे अनैतिक संबंध
चौकशीदरम्यान अमोलने पत्नीच्या हत्येची कबुली दिली. पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. तिचे एका युवकासोबत अनैतिक संबंध होते, असा दावा त्याने केला. मात्र, हत्येमागील नेमके कारण, हल्ल्यात वापरलेले शस्त्र आणि गुन्ह्यातील साथीदाराची भूमिका याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. हत्येचे शस्त्र जप्त करण्यासह फॉरेन्सिक पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.