अनिल कांबळे
नागपूर,
nagpur family violence cases सामाजिक जिवनात माहेर आणि सासरच्या अतिहस्तक्षेपामुळे कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनेनंतर गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढले होते. मात्र, पोलिसांच्या सकारात्मक प्रयत्नामुळे गेल्या आठ महिन्यांत कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये तब्बल १५ टक्क्यांनी घट झाली आहे. यासाठी पोलिसांचे समूपदेशनाने महत्वाची भूमिका बजावली आहे.
कुटुंबात आर्थिक ताणतणाव, वाढती बेरोजगारी, आर्थिक असुरक्षितता आणि विस्कटलेले बजेट यामुळे कौटुंबिक हिंसाचाराचे प्रमाण वाढले होते. तसेच कुटुंबातील मानसिक ताणतणाव, बदलती जीवनशैली आणि परस्परसंवादाचा अभाव असल्यामुळे कुटुंबातील वातावरण दुषित झाले आहे. अनेकदा गैरसमज आणि व्यसनासह सोशल मीडियाचा अतिवापर, प्रेमसंबंध, विवाहबाह्य संबंध आणि व्यसनाधीनतासुद्धा कौटुंबिक हिंसाचारास कारणीभूत ठरत आहे. सध्या संयुक्त कुटुंबाची जागा विभक्त कुटुंबाने घेतल्यामुळे पती-पत्नीमध्ये स्वाभिमान दुखवल्यामुळे कुटुंबाची घडी विस्कटल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. शिक्षित दाम्पत्यांमध्ये सर्वाधिक ‘ईगो’ आडवा येत असल्यामुळे कुटुंब संस्थेचे महत्व कमी झाले आहे. कमावते दाम्पत्य असल्यास वादाची ठिणगीसुद्धा कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांपर्यंत पोहचत आहे. अनैतिक संबंध, विवाहबाह्य संबंध ठेवणारे तरुण-तरुणी लग्न झाल्यानंतरही ते संबंध कायम ठेवण्यासाठी धडपड करीत असल्यामुळेसुद्धा घरातील वातावरण बिघडत आहे. तसेच माहेर आणि सासरच्या मंडळींच्या अतिहस्तक्षेपामुळेसुद्धा कौटुंबिक वातावरण दुषित होत आहे.
अशी आहे आकडेवारी
वर्ष २०२५ मध्ये कौटुंबिक हिंसाचाराचे १५५ गुन्हे दाखल होते. त्या सर्व गुन्ह्यांचा निपटारा दाखल करुन आरोपपत्र न्यायालयात पाठविण्यात आले आहेत. २०२६ ऑगस्टपर्यंत १३१ गुन्हे दाखल असून त्या सर्व गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी कारवाई केली आहे. गतवर्षीच्या तुलनेत २४ गुन्ह्यात घट झाली असून टक्केवारीमध्ये १५ टक्के गुन्हे यावर्षी कमी झाले आहेत.
कौटुंबिक कलहामुळे घटस्फोट
कौटुंबिक कलहामुळे विवाहित महिला थेट पोलिस ठाण्यात जाऊन सासरच्या मंडळीविरुद्ध कलम ४९८ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेते. पोलिसांत तक्रार केल्यानंतर सासरची मंडळी विवाहितेला पुन्हा स्विकारायला तयार नसतात. न्यायालयीन लढाई लढण्याची तयारी दर्शवतात. गुन्हे दाखल झाल्यानंतर अनेक दाम्पत्य घटस्फोटासारखा टोकाचा निर्णय घेऊन मोकळे होतात.
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारींनंतर कुटुंबीयांना समूपदेशन करण्यासाठी भरोसा सेल कार्यान्वित आहे. कौटुंबिक स्वरुपाच्या तक्रारीत थेट गुन्हा दाखल झाल्यास संसार तुटणे किंवा कुटुंब विस्कटण्यासारखा प्रकार होतो. मात्र, पोलिसांकडून होणाऱ्या समूपदेशनामुळे अनेक कुटुंब विस्कळीत होण्यापासून वाचले आहेत.
- नवीनचंद्र रेड्डी (पोलिस सहआयुक्त, नागपूर शहर)