चोरीआधीच दोघे पोलिसांच्या जाळ्यात

७ मिनिटांत पोलिस घटनास्थळी; चोरीची दुचाकी, चाकू व लोखंडी साहित्य जप्त

    दिनांक :26-Sep-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर
nagpur police  चोरीच्या उद्देशाने संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या चौघांची माहिती नागरिकाने डायल ११२ वर दिली. नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळताच मानकापूर पोलिसांनी अवघ्या सात मिनिटांत घटनास्थळ गाठले आणि चोरीच्या तयारीत असलेल्या दोघांना पकडले, तर त्यांचे दोन साथीदार अंधाराचा फायदा घेत पसार झाले. अटकेतील दोघांचा गुन्हेगारी इतिहासही पोलिसांच्या तपासात समोर आला. हर्ष सदानंद बोंबर्डे (२४, रा. भीमसेनानगर) आणि अंकित परवेश रागासे (२२, रा. जरीपटका) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
 

nagpur police foil theft plan in seven minutes, two arrested 
हर्षविरुद्ध चोरी, घरफोडीसह गंभीर स्वरूपाचे २२ गुन्हे दाखल आहेत. अंकितविरुद्धही ५ गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले. हर्ष, अंकित आणि त्यांचे दोन साथीदार फरस चौक परिसरात संशयास्पदरीत्या फिरत होते. त्यांच्या हालचाली एका जागरूक नागरिकाच्या लक्षात आल्या. त्याने तत्काळ डायल ११२ वर संपर्क साधून माहिती दिली. नियंत्रण कक्षाकडून संदेश मिळताच मानकापूर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांना पाहताच चौघांनी पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून हर्ष आणि अंकितला ताब्यात घेतले. दरम्यान, त्यांचे दोन साथीदार अंधाराचा फायदा घेत पसार झाले. त्यांचा शोध सुरू आहे.
 
चोरीची दुचाकी, चाकूसह साहित्य जप्त
 
आरोपी ज्या दुचाकीवरून फिरत होते, तिची तपासणी केली असता ती चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी दुचाकीसह लोखंडी रॉड, चाकू आणि लोखंडी पाना जप्त केला. चौघे नेमक्या कोणत्या ठिकाणी चोरी करण्याच्या तयारीत होते, तसेच पसार झालेल्या दोघांची ओळख काय, याचा तपास सुरू आहे.
नागरिकाचा सतर्कपणा ठरला महत्त्वाचा
 
 
संशयास्पद हालचाली वेळीच पोलिसांच्या निदर्शनास आणून दिल्याने अवघ्या सात मिनिटांत पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यामुळे संभाव्य गुन्हा टळण्यास मदत झाली. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक हरीश काळसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनील डगवाल, उद्धव पोपरकर, विजय यादव, अनूप यादव, आशिष सातपूते आणि कृष्णा टेकाम यांच्या पथकाने केली.