अनिल कांबळे
नागपूर,
nagpur road accident जपानी गार्डन चौकात गुरुवारी दुपारी सुमारे ३ वाजताच्या सुमारास सिग्नल तोडून जाणाऱ्या तीन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची दुचाकी समोरून येणाऱ्या कारला धडकली. दुचाकीवरील १८ वर्षीय विद्यार्थिनी तन्वी रूपेश कोटेवार ही कारच्या खाली अडकली. नागरिक आणि वाहतूक पोलिसांनी तिला रुग्णालयात दाखल केले. तिच्यासोबत असलेला शुभम आरसोडे हादेखील किरकोळ जखमी झाला, तर जीवांश दुबे थोडक्यात बचावला.
तन्वी, शुभम आणि जीवांश हे तिघेही गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथील रहिवासी असून नागपुरातील तिरपुडे महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. तन्वी बीबीए प्रथम वर्षाची विद्यार्थिनी आहे. गुरुवारी महाविद्यालय सुटल्यानंतर तिघे नाश्ता करण्यासाठी गेले होते. नाश्ता आटोपून ते पुन्हा महाविद्यालयाकडे परतत असताना हा अपघात झाला. तन्वी दुचाकी चालवत होती, तर शुभम आणि जीवांश मागे बसले होते. दुचाकी नुकतीच घेतलेली असून तिला अद्याप आरटीओचा क्रमांकही मिळालेला नव्हता. पोलिसांच्या माहितीनुसार, तन्वीने हेल्मेट घातले नव्हते.
सिग्नल तोडला अन् कारला धडक
जपानी गार्डन चौकात पोहोचल्यानंतर प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, दुचाकीचालकाने सिग्नल लाल असतानाही तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी समोरून येणाऱ्या एमएच-३२-एएक्स-००६४ क्रमांकाच्या कारला दुचाकीची जोरदार धडक बसली. धडकेनंतर तन्वी कारच्या चाकाखाली आली आणि काही अंतरापर्यंत घसरत गेल्याने कारखाली अडकली. अपघात होताच चौकातील नागरिक आणि वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कारखाली अडकलेल्या तन्वीला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आले. अखेर मोठ्या प्रयत्नांनंतर तिला बाहेर काढण्यात यश आले. गंभीर जखमी अवस्थेत तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. सदरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे. प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदविण्यासह अपघाताची नेमकी परिस्थिती तपासली जात आहे. प्राथमिक माहितीनुसार सिग्नल तोडणे, ट्रिपल सीट आणि हेल्मेटचा अभाव ही अपघातामागील प्रमुख कारणे असल्याचे समोर आले आहे. संबंधित दुचाकीस्वारांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.