अनिल कांबळे
नागपूर
nagpur rto विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) स्कूलबसविरोधातील तपासणी मोहीम राबवत आतापर्यंत १२ स्कूलबस जप्त केल्या. त्यांच्याकडून १९ लाख ४६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. आतापर्यंत शहरातील १,८०२ स्कूलबसची तपासणी करण्यात आली. मोटार वाहन कायदा आणि संबंधित नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ७९७ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.

तपासणीदरम्यान स्कूलबसचे परवाने, फिटनेस प्रमाणपत्र, विमा, वाहन कर, प्रदूषण प्रमाणपत्र, आपत्कालीन उपकरणे, प्रथमोपचार पेटी, आपत्कालीन दरवाजे, चालकाचा परवाना तसेच बसमधून वाहून नेण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आदी बाबी तपासण्यात आल्या. गंभीर त्रुटी आढळलेल्या बस जप्त करण्यात आल्या. वैध फिटनेस प्रमाणपत्राशिवाय धावणाऱ्या वाहनांवर पुढील कारवाईसाठी वाहतूक पोलिसांकडे प्रकरणे पाठविण्यात आली. वारंवार सूचना देऊनही सुरक्षा नियमांचे पालन न करणाऱ्या ४४ स्कूलबसचे परवाने व नोंदणी रद्द करण्यात आली आहे. दरम्यान, १६ जुलै २०२६ रोजी अधिसूचित करण्यात आलेल्या स्कूलबस नियमांमधील सुधारणांनुसार बसमध्ये पॅनिक बटण, व्हीएलटीडी (व्हेईकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइस), सीसीटीव्ही कॅमेरे तसेच आग लागल्याचे निदान व अलर्ट देणारी यंत्रणा बसविणे आवश्यक आहे. सीसीटीव्हीचे फुटेज पालकांना उपलब्ध करून देण्याची तरतूदही करण्यात आली आहे. स्कूलबस चालकांना नियमित प्रशिक्षण देणे, तसेच चालक आणि विद्यार्थ्यांच्या वाहतुकीशी संबंधित कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी व चारित्र्य पडताळणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तीन महिन्यांचा नियमपालन कालावधी पूर्ण झाल्यानंतर १६ ऑक्टोबरनंतर पुन्हा विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार असल्याचे आरटीओकडून स्पष्ट करण्यात आले आहे.