अवकाशात ‘हार्वेस्ट मून’चे आकर्षण; चंद्राचा रंग बदलतो?

शनी आणि चंद्र युतीचा दुर्मिळ योग आर्वीकरांना अनुभवता येणार

    दिनांक :26-Sep-2026
Total Views |
आर्वी,
does-the-moon-change-color खगोल अभ्यासक व अवकाश प्रेमींसाठी २६ सप्टेंबर ते ४ ऑटोबर मोठी पर्वणी लाभणार आहे. भाद्रपद शुद्ध पौर्णिमेचा चंद्र ‘हार्वेस्ट मून’ म्हणून ओळखला जातो. याच दिवशी चंद्र आणि शनी ग्रहाची युती रात्रभर बघता येईल. विशेष म्हणजे, चंद्र आणि शनी हे दोन्ही पृथ्वीच्या जवळ येत असल्याने हा देखावा अधिक मनमोहक असेल, अशी माहिती विश्वभारती केंद्राचे प्रमुख प्रभाकर दोड यांनी दिली.
 
 
 
दरवर्षी सप्टेंबर किंवा ऑटोबर महिन्यात हा चंद्र आकाशात दिसतो. जुन्या काळात जेव्हा शेतात विजेची सोय नव्हती, तेव्हा शेतकरी या चंद्राच्या प्रखर प्रकाशामध्ये रात्रीच्या वेळीही पिकांची कापणी करीत होते. त्यामुळे या पौर्णिमेच्या चंद्राला ‘हार्वेस्ट मून’ असे नाव पडले. हा चंद्र क्षितिजावर उगवतो, त्यावेळी नेहमीपेक्षा जास्त मोठा आणि गडद नारंगी किंवा सोनेरी रंगाचा दिसतो. पृथ्वीच्या वातावरणातील धुलीकण आणि आर्द्रतेमुळे चंद्राचा रंग बदललेला दिसतो. ही एक नैसर्गिक आणि वैज्ञानिक प्रक्रिया आहे.
 
 
गणेशोत्सवात चंद्र-शुक्र आणि चंद्र-शनीचा दुर्मिळ योग जुळून येत आहे. गणरायाच्या आगमनाच्या दिनी चंद्र आणि शुक्र युतीचे अद्भूत दृश्य दिसून आले होते. आता गणपती बाप्पा निरोप घेत असताना चंद्र आणि शनी युती एक अनोखा आनंद देऊन जाणार आहे. पृथ्वीपासून चंद्र व शनी ग्रहाचे अंतर कमी होत आहे. या दोन्ही खगोलीय घटना एक दुर्मिळ पर्वणीच ठरली आहे. या काळात दुर्बिणीच्या सहाय्याने शनीच्या वलयाचे स्पष्ट दर्शन होणार आहे.
 
 
येत्या २ ऑटोबरला चंद्र सुमारे १५ हजार किमी पृथ्वीच्या जवळ येणार आहे व शनी ग्रह येत्या ४ ऑटोबरला पृथ्वीच्या जवळ येत आहे. शनी ग्रहाच्या वलयाचे दर्शन गेल्या काही वर्षांपासून दुर्लभ झाले होते. ते यावेळी पाहणे अधिक सोयीचे आणि स्पष्ट होईल. चंद्र आणि शनी युती बघताना ईशान्य दिशेला पृथ्वीपासून सुमारे २.५ लाख प्रकाश वर्षे दूर असलेली एम. ३१ ही आपल्या शेजारची आकाशगंगा नुसत्या डोळ्यांनी दिसणार आहे. ती कापसाच्या बोंडासारखी रात्रभर बघता येईल. सर्वांगसुंदर शनी आणि चंद्र युती, सोबतीला मीन राशीतील रेवती आणि मनात अधिक उत्साह भरणारी शर्मिष्ठा आणि ययाती अशी ही आकाशस्थिती एक अप्रतिम अनुभूती देईल, असेही प्रभाकर दोड यांनी सांगितले. विदर्भातील काही खगोल मंडळांनी या घटनेचे थेट प्रक्षेपण आणि निरीक्षण शिबिर आयोजित करण्याची तयारी सुरू केली आहे.