बीड,
The death of Shivajirao Shinde बीडच्या राजकीय वर्तुळाला हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख शिवाजीराव शिंदे यांचा त्यांच्या राहत्या घरी मृत्यू झाला. दादाहरी वडगाव येथील त्यांच्या निवासस्थानी ही घटना घडली. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.घटनेची माहिती मिळताच बीड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर शिवाजीराव शिंदे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला. त्यांच्या पार्थिवावर दुपारी अकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

शिवाजीराव शिंदे यांच्या मृत्यूमागील कारण अद्याप समोर आलेले नाही. त्यामुळे त्यांच्या मृत्यूशी संबंधित सर्व शक्यता तपासल्या जात असून तपास पूर्ण झाल्यानंतरच नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या घटनेने बीडसह महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.विशेष म्हणजे, मे 2026 मध्ये शिवाजीराव शिंदे यांच्यावर परळी शहरातील त्यांच्या मालकीच्या हॉटेलमध्ये जीवघेणा हल्ला झाला होता. हॉटेलमध्ये असताना एका युवकाने त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला होता. या घटनेत शिंदे गंभीर जखमी झाले होते. हॉटेलमधील इतर व्यक्तींनी संबंधित युवकाला पकडल्याने परिस्थिती नियंत्रणात आली होती.
या हल्ल्यानंतर शिवाजीराव शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. सुरवसे नावाच्या एका युवकाने आपल्यावर हल्ला केल्याचे त्यांनी सांगितले होते. संबंधित युवकाची आपल्याशी वैयक्तिक ओळख नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र, त्याचा आणि आपल्या मुलाचा काहीतरी वाद असल्याचे आपल्याला समजल्याचे शिंदे यांनी त्यावेळी सांगितले होते.शिंदे यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित युवक त्यांच्या घरासमोर आला होता आणि तेथे शिवीगाळ केली होती. त्यानंतर झालेल्या हल्ल्यात त्यांच्या हातापायांना दुखापत झाली होती. तसेच त्यांच्या हॉटेलमधील पैसे लुटल्याचाही आरोप त्यांनी केला होता. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी झालेल्या या हल्ल्याचा आणि आता झालेल्या शिवाजीराव शिंदे यांच्या मृत्यूचा काही संबंध आहे का, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे. मात्र, यासंदर्भात कोणताही निष्कर्ष काढलेला नसून पोलीस तपासातूनच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.