काबूल,
28 killed on Pakistan-Afghanistan border पाकिस्तानातून पूर्व अफगाणिस्तानात झालेल्या कथित घुसखोरीनंतर 28 लढवय्ये ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये बहुतांश जण हे अफगाण सुरक्षा दलाचे माजी सदस्य असल्याचे तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने वृत्तसंस्था रॉयटर्सला सांगितले. या घटनेनंतर पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरील परिस्थिती अधिक तणावपूर्ण बनली आहे.
ड्युरंड लाईनजवळील गुलिस्तान सेक्टरमध्ये गेल्या काही दिवसांपासून दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या ताज्या संघर्षात तालिबानच्या काही सदस्यांचाही मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. नियोजित हल्ल्यांबाबतची नेमकी माहिती अद्याप स्पष्ट झालेली नसल्याचे अफगाणिस्तान इंटरनॅशनलच्या सूत्रांनी सांगितले.दरम्यान, पाकिस्तानच्या सुरक्षा सूत्रांनी या कारवाईला प्रत्युत्तरात्मक कारवाई असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानी हद्दीत घुसखोरी करून आक्रमक कारवाया करण्याचा प्रयत्न झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचा त्यांचा दावा आहे. अफगाण तालिबान दल आणि पाकिस्तानी सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये गोळीबार सुरू असून, सीमेवरील तैनात सैनिकांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.