LoC हटवा, भारताचे मार्ग खुले करा!

पाकिस्तानला PoK मधून थेट आव्हान

    दिनांक :27-Sep-2026
Total Views |
इस्लामाबाद,
A direct challenge to Pakistan from PoK पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानविरोधातील असंतोष पुन्हा तीव्र झाला असून, शनिवारी (२६ सप्टेंबर २०२६) अवामी ॲक्शन कमिटीने (AAC) LoC हटवून जम्मू-काश्मीरशी संपर्काचे मार्ग खुले करण्याची मागणी केली. ९ जूनपासून सुरू असलेल्या बंडखोरीच्या ११० व्या दिवशी LoC पासून अवघ्या ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या मंधोल गावात आयोजित धरणे आंदोलनात तब्बल २५,००० नागरिक सहभागी झाले. यावेळी AAC चे प्रमुख नेते सरदार अमन खान यांनी पाकिस्तानकडून गेल्या तीन महिन्यांपासून PoK चा रेशन पुरवठा रोखण्यात आल्याचा दावा करत LoC रद्द करण्याबाबत जमावाची भूमिका जाणून घेतली. उपस्थितांनी एकमुखाने समर्थन दर्शवले. पूंछ आणि मेंढरकडे जाणारे मार्ग खुले करण्यासाठी आंदोलन करावे का, या प्रश्नालाही नागरिकांनी जोरदार होकार दिला.
 

2343546 
 
अमन खान यांनी पाकिस्तानला थेट आव्हान देताना PoK मधील नागरिकांना गुलाम मानता येणार नसल्याचे सांगितले. गेल्या ८० वर्षांपासून पाकिस्तानी लष्कराकडून PoK मधील नागरिकांच्या जमिनी आणि संसाधनांची लूट होत असल्याचा आरोप त्यांनी केला. रुग्णालये, शाळा, शिक्षण आणि रोजगाराची मागणी करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात आली असून, १०० हून अधिक लोकांची हत्या झाल्याचा दावाही त्यांनी केला. पाकिस्तानच्या PoK वरील ७८ वर्षांच्या ताब्यामुळेच या भागातील समस्या निर्माण झाल्याचे सांगत, नागरिकांनी या ताब्याविरोधात उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले. गेल्या तीन महिन्यांपासून रेशन पुरवठा रोखण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित करताना, पूर्वी PoK मधील नागरिकांचे पूर्वज भारतीय जम्मू-काश्मीरमधील मेंढर येथून रेशन खरेदी करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
दरम्यान, PoK मधील सर्व ४५ जागांसाठी गेल्या महिन्यात निवडणुका होणार होत्या. मात्र, ९ जूनपासून पूंछ आणि सुधनोटी जिल्ह्यांतील सात जागांवर सुरू असलेल्या बंडखोरीमुळे या जागांवर अद्याप मतदान झालेले नाही. उर्वरित ३८ जागांवर मतदान झाल्यानंतर शहबाज शरीफ यांच्या पीएमएल (एन) पक्षाला २५ जागा मिळाल्या आणि त्यांना विजयी घोषित करण्यात आले. या पार्श्वभूमीवर अमन खान यांनी पाकिस्तानला सात जागांवर निवडणुका घेता आल्या नसल्याचा दावा केला. तसेच PoK मधील नागरिकांच्या संमतीशिवाय या जागांवर निवडणुका घेणे शक्य होणार नसल्याचे त्यांनी म्हटले. मुझफ्फराबादमधील सरकारवरही त्यांनी टीका करत पाकिस्तानच्या ताब्याविरोधातील संघर्ष सुरूच ठेवण्याची भूमिका मांडली.