ना डिजे, ना ढोल, वाजंत्र्याविना बैलगाडीतून विसर्जन मिरवणूक

गिरड येथे अनोख्या पद्धतीने बाप्पाला निरोप

    दिनांक :27-Sep-2026
Total Views |
समुद्रपूर,
farewell to bappa गणेशोत्सवादरम्यान, डिजे, ढोलची धामधूम असते. मात्र, पुणे, मुंबईत शांततापूर्ण गणेश उत्सव साजरा करण्यासाठी रान उठले. डिजेमुळे मोठ्या प्रमाणात ध्वनीप्रदूषण होत असून याचा नागरिकांच्या आरोग्यावरही मोठा परिणाम होतो. त्यामुळे हा सण-उत्सव शांततेत आणि सामाजिक आणि पारंपारिक पद्धतीने साजरा व्हावा, यासाठी सर्वत्र प्रयत्न होत असतानाच गिरड पोलिस ठाण्यात प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या लाडया बाप्पाला अनोख्या पद्धतीने निरोप देण्यात आला. ना डिजे, ना ढोल, वाजंत्र्याविना बैलगाडीतून विसर्जन मिरवणूक काढून एक आगळावेगळा संदेश देण्यात आला.
 

farewell to bappa 
 
गिरड येथील पोलिस ठाण्यात गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. दरवर्षी १० दिवसाचा हा उत्सव यंदा १२ दिवस घरोघरी गणपती विराजमान राहिले. गिरड पोलिस ठाण्यातही सलग १२ दिवस पूजा, आरती आणि गणेशाची आराधना करण्यात आली. शनिवारी या गणरायाला निरोप देण्याची वेळ आली. सर्वत्र डिजे, ढोल-ताशाच्या गजरात विसर्जन मिरवणूक निघत असताना पोलिसांनी लाडया बाप्पाला अनोख्या पद्धतीने निरोप देण्याची संकल्पना अमलात आणली. डिजे, बँड-बाजा आणि ध्वनिवर्धकाला फाटा देत भजनी मंडळींच्या गजरात बैलबंडीच्या रथातून बाप्पाची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली.
गावातील मुख्य रस्त्याने निघालेल्या या मिरवणुकीने ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले.farewell to bappa  पारंपरिक पद्धतीने, कोणताही ध्वनी व प्रदूषणाचा त्रास न होऊ देता गणेश विसर्जनाचा संदेश पोलिस विभागाने यानिमित्ताने दिला. साधेपणा, पर्यावरणपूरकता आणि भक्तीमय वातावरण यामुळे ही मिरवणूक विशेष ठरली.
 
या विसर्जन मिरवणुकीत ठाणेदार विकास गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक गोमेद पाटील यांच्यासह पोलिस कर्मचार्‍यांनी सहभाग घेतला. पोलिस ठाण्याच्या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले.