बायोचारच्या माध्यमातून शाश्वत शेतीला नवी दिशा

नागपुरात बायोचार निर्मिती परिषदेचे उद्घाटन

    दिनांक :27-Sep-2026
Total Views |
नागपूर,
biochar-nagpurशेतीच्या विकासासाठी उत्तम दर्जाचे बियाणे व कलम, जमिनीची नियमित तपासणी आणि जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविणे या तीन बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. मातीचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी सेंद्रिय कर्बाची भूमिका महत्त्वाची असून, त्याचे प्रमाण वाढविण्यासाठी बायोचार हा प्रभावी पर्याय ठरू शकतो. मोठ्या प्रमाणावर बायोचार निर्मिती करून त्याचा शेतीमध्ये वापर केल्यास शाश्वत शेतीला नवी दिशा मिळू शकते, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

gadkari
 
अॅग्रोव्हिजन फाउंडेशनच्या वतीने नागपुरातील हॉटेल तुली इम्पेरियल येथे आयोजित बायोचार निर्मिती परिषदेचे उद्घाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. परिषदेला महाराष्ट्रातील विविध भागांतून आलेल्या युवा शेतकऱ्यांचा मोठा सहभाग होता.
 
शेतीमध्ये उत्पादनवाढीसोबतच जमिनीची सुपीकता आणि आरोग्य जपणे आवश्यक असल्याचे गडकरी यांनी यावेळी अधोरेखित केले. जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविण्यासाठी उपलब्ध कृषी अवशेषांचा योग्य पद्धतीने वापर करून बायोचार निर्मितीला चालना देता येऊ शकते. यामुळे कृषी क्षेत्रात शाश्वत पद्धती विकसित करण्यास मदत होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.
 
परिषदेला डॉ. बावसकर टेक्नॉलॉजी प्रा. लि.चे कार्यकारी व्यवस्थापकीय संचालक धैर्यशील बावसकर, बायोचार बाईट अॅगटेक प्रा. लि., पुणेचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी उदय कुमार मठपती, ग्रो इंडिगो कंपनीच्या संस्थापक डॉ. उषा बरवाले, प्रगतिशील शेतकरी आनंद राऊत, अॅग्रोव्हिजन फाउंडेशनचे अध्यक्ष रवी बोरटकर आणि सचिव डॉ. सी. डी. मायी यांची मंचावर उपस्थिती होती.
 
बायोचार निर्मिती, त्याचा कृषी क्षेत्रातील वापर, मातीचे आरोग्य आणि सेंद्रिय कर्बवाढ यासंदर्भातील विविध विषयांवर परिषदेत मार्गदर्शन करण्यात आले. युवा शेतकऱ्यांसाठी आधुनिक व शाश्वत कृषी तंत्रज्ञानाची माहिती मिळण्याच्या दृष्टीने ही परिषद महत्त्वपूर्ण ठरली.