ब्रह्मपुरी,
brahmapuri-drought-relief-demandराज्य शासनाने खरीप हंगामातील दुष्काळी परिस्थितीच्या पृष्ठभूमीवर राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला. मात्र, या यादीत ब्रह्मपुरी तालुक्याचा समावेश करण्यात आलेला नाही. ब्रह्मपुरी तालुक्यात यंदा कमी पावसामुळे शेतीपिकांवर गंभीर परिणाम झाला असून, शेतकरी अडचणीत सापडला आहे. या पृष्ठभूमीवर ब्रमाजी आमदार प्रा. अतुल देशकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करण्याची मागणी केली आहे.
प्रा. देशकर यांनी याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र पाठवून ब्रह्मपुरी तालुक्यातील प्रत्यक्ष परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच त्यांनी मुख्यमंत्री यांच्या सोबत दूरध्वनीवरून चर्चा करून तालुक्यात कमी पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती, पिकांचे झालेले नुकसान आणि शेतकऱ्यांच्या अडचणी याबाबत सविस्तर माहिती दिली. ब्रह्मपुरी तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने खरीप पिकांवर मोठा परिणाम झाला आहे.
अनेक शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळण्याची शक्यता कमी असून, सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना शासनाच्या दुष्काळी सवलती आणि मदतीची आवश्यकता आहे. त्यामुळे शासनाने ब्रह्मपुरी तालुक्याचा वस्तुनिष्ठ पद्धतीने आढावा घेऊन दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी प्रा. देशकर यांनी केली आहे.