CGL परीक्षा गैरप्रकारात CIDची मोठी कारवाई

आणखी ३ उमेदवारांना अटक

    दिनांक :27-Sep-2026
Total Views |
रांची,
CID in CGL exam irregularities झारखंड कर्मचारी निवड आयोगाच्या (JSSC) CGL परीक्षा-2023 मधील कथित गैरप्रकाराच्या तपासात झारखंड CIDने आणखी तीन उमेदवारांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये कोडरमा येथील अजय कुमार, गिरिडीह येथील संजय कुमार आणि रामाकृष्णा सिंह यांचा समावेश आहे. CIDच्या अधिकाऱ्यांनुसार, तिघांनीही परीक्षेत अनुचित पद्धतीने फायदा घेतल्याचा आरोप आहे. या तिघांच्या अटकेनंतर या प्रकरणातील एकूण अटक झालेल्या व्यक्तींची संख्या १९ झाली आहे.
 
  
 
CID in CGL exam irregularities
 
JSSC CGL परीक्षा-2023मध्ये पेपर लीक आणि अन्य गैरप्रकार झाल्याचे आरोप झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. परीक्षा रद्द करून संपूर्ण प्रकरणाची CBI चौकशी करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. त्यानंतर हेमंत सोरेन सरकारने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि तपासाची जबाबदारी CIDकडे सोपवली. CIDने परीक्षा घेणारी एजन्सी, कोचिंग संचालक आणि संशयित उमेदवारांची चौकशी सुरू केली. यासोबतच पेपर लीकशी संबंधित कथित नेटवर्कचाही तपास करण्यात येत असून, त्याच तपासाच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत सातत्याने अटक करण्यात येत आहे.
 
 
CIDच्या अधिकाऱ्यांनी रविवारी दिलेल्या माहितीनुसार, अजय कुमार, संजय कुमार आणि रामाकृष्णा कुमार यांना अटक करण्यात आली. काही सूत्रांच्या माहितीनुसार अजय कुमार हा आरोग्य विभागातील कनिष्ठ सचिवालय सहाय्यक असल्याचे सांगितले जात आहे, तर गिरिडीहचा संजय कुमार जमशेदपूरमध्ये फूड इन्स्पेक्टर असल्याचेही सांगितले जात आहे. रामाकृष्णा हा गिरिडीहचा रहिवासी असल्याची माहिती असून, त्याच्याबाबत अधिक तपशील अद्याप समोर आलेला नाही. चौकशीनंतर तिघांनाही CIDच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांची रवानगी रांची सेंट्रल जेलमध्ये करण्यात आली. तपास सुरू असल्याने या प्रकरणात आणखी काही जणांच्या अटकेची शक्यता असल्याचे CIDकडून सांगण्यात आले आहे.