डिलिव्हरी बॉयच्या डोळ्यांत मिरचीपूड टाकून पार्सलची लुट

    दिनांक :27-Sep-2026
Total Views |
नवी दिल्ली
delhi robbery डिलिव्हरी बॉयच्या डोळ्यांत मिरचीपूड टाकून त्याच्याकडील पार्सल लुटल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी दोन सख्ख्या बहिणींना अटक केली आहे. रोहिणीतील बुध विहार परिसरात ही घटना घडली होती. पोलिसांनी अवघ्या १५ तासांत या प्रकरणाचा छडा लावत नॅन्सी सिंह (२६) आणि ग्रेसी सिंह (२०) यांना ताब्यात घेतले.
 

delhi robbery two sisters arrested for looting delivery boy with chilli powder 
२५ सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे ७.२० वाजता सेक्टर-५, रोहिणी येथील हनुमान मंदिराजवळ एक डिलिव्हरी बॉय पार्सल घेऊन जात होता. त्यावेळी एक तरुणी ग्राहक असल्याचे भासवत त्याच्याजवळ आली आणि डिलिव्हरी बॅगमधून पार्सल जबरदस्तीने काढण्याचा प्रयत्न करू लागली. डिलिव्हरी बॉयने विरोध करताच तिने त्याच्या डोळ्यांत मिरचीपूड टाकली.याच वेळी दुसरी तरुणी स्कूटीवरून तेथे आली आणि तिने डिलिव्हरी बॉयला मागून धडक दिली. या धडकेत तो रस्त्यावर पडला आणि त्याच्या पायाला दुखापत झाली. त्यानंतर दोन्ही बहिणींनी डिलिव्हरी बॅगमधील अनेक पार्सल घेऊन घटनास्थळावरून पळ काढला.घटनेची तक्रार मिळाल्यानंतर बुध विहार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला. पोलिसांनी तांत्रिक निगराणी तसेच खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे दोन्ही संशयितांची ओळख पटवली. त्यानंतर नॅन्सी आणि ग्रेसी यांना १५ तासांच्या आत अटक करण्यात आली.पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून लुटलेली तीन पार्सल, घटनेत वापरलेली स्कूटी आणि मोबाइल फोन जप्त केला आहे. चौकशीदरम्यान दोन्ही बहिणींनी गुन्ह्यात सहभागी असल्याची कबुली दिल्याचा पोलिसांचा दावा आहे. दोघीही करोल बाग परिसरातील रहिवासी आहेत. नॅन्सीने फॅशन डिझायनिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला असून सध्या ती बेरोजगार आहे, तर ग्रेसीने बारावीनंतर शिक्षण सोडले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, दिल्लीमध्ये अलीकडेच खेळण्यातील पिस्तुलासारख्या दिसणाऱ्या ‘टॉय लाइटर पिस्तूल’चा धाक दाखवून सुमारे दीड कोटी रुपयांची लूट केल्याचे प्रकरण समोर आले होते. त्या प्रकरणात पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली होती.