‘बिग बॉस मराठी’ फेम दिव्या शिंदेवर गंभीर आरोप

माजी वैद्यकीय अधिकाऱ्याच्या घरात घुसून मारहाणीचा दावा

    दिनांक :27-Sep-2026
Total Views |
पुणे
divya shinde ‘बिग बॉस मराठी’मुळे चर्चेत आलेली रीलस्टार दिव्या शिंदे हिच्यासह आण्णा ढमढेरे आणि अन्य आठ ते दहा जणांविरुद्ध पुण्यातील काळेपडळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्याधर गायकवाड यांच्या घरात घुसून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच ‘कला आविष्कार महोत्सवा’ची प्रसिद्धी केल्याच्या मोबदल्यात पाच लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचा दावाही पोलिसांत दाखल तक्रारीत करण्यात आला आहे.
 

divya shinde accused in pune attack case over rs 5 lakh extortion  
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. विद्याधर गायकवाड हे २०२१ मध्ये पुणे कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमधून मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून निवृत्त झाले आहेत. ते करुणादीप फाउंडेशनचे सदस्य असून, या संस्थेच्या वतीने १ ते ३ सप्टेंबरदरम्यान बालगंधर्व रंगमंदिरात ‘कला आविष्कार महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी दिव्या शिंदे हिला गायकवाड किंवा संस्थेकडून कोणतेही अधिकृत निमंत्रण देण्यात आले नव्हते. तसेच कार्यक्रमाची प्रसिद्धी करण्याची जबाबदारीही तिला देण्यात आली नव्हती, असा उल्लेख तक्रारीत आहे.
मात्र, आपण कार्यक्रमाची प्रसिद्धी केली असल्याचा दावा करत दिव्या शिंदेकडून ऑगस्ट महिन्यापासून फोन आणि संदेशांच्या माध्यमातून पाच लाख रुपयांची मागणी केली जात असल्याचे गायकवाड यांनी पोलिसांना सांगितले आहे. त्यानंतर १७ सप्टेंबर रोजी दिव्या शिंदे, आण्णा ढमढेरे आणि काही अन्य व्यक्ती गायकवाड यांच्या घरी गेल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्या वेळी गायकवाड घरी उपस्थित नव्हते. त्यांच्या पत्नी आणि मुलाला दमदाटी करण्यात आल्याचा आरोप आहे.
यानंतर २३ सप्टेंबर रोजी आण्णा ढमढेरे याने फोन करून गायकवाड यांना हॉटेल ब्ल्यू नाईन येथे बोलावल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तेथे पुन्हा पाच लाख रुपयांची मागणी करण्यात आली. पैसे न दिल्यास दोन दिवसांत घरी माणसे पाठवून मारहाण करण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे.
तक्रारीनुसार, २४ सप्टेंबर divya shinde रोजी रात्री साडेआठच्या सुमारास गायकवाड हे घरी एकटे असताना ढमढेरे त्यांच्या घरी आला. त्यांनी दरवाजा उघडल्यानंतर दिव्या शिंदेसह आठ ते दहा जणांनी घरात प्रवेश केला. त्यानंतर आरोपींनी गायकवाड यांच्या तोंडावर, पोटावर आणि पाठीवर लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. पाच लाख रुपये का दिले नाहीत, असा जाब विचारत त्यांना धमकावण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
गायकवाड यांनी आपण पक्षाघाताचे रुग्ण असल्याचे सांगून मारहाण थांबवण्याची विनंती केली. मात्र, त्यानंतरही मारहाण सुरूच राहिल्याचा आरोप आहे. यावेळी एका व्यक्तीने धारदार हत्याराने त्यांच्या डोक्यावर वार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर दांडके, कमरेचे पट्टे आणि लोखंडी भांडे वापरूनही मारहाण करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
काही वेळाने गायकवाड यांचा मुलगा आणि सून घरी परतल्यानंतर त्यांनाही दमदाटी करण्यात आली. पाच लाख रुपये न दिल्यास कार घेऊन जाण्याची धमकी देण्यात आली आणि आरोपी गायकवाड यांची कार घेऊन गेल्याचा आरोप तक्रारीत आहे. याशिवाय घरातील साहित्याची तोडफोड करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास काळेपडळ पोलिसांकडून करण्यात येत आहे.