सिंदी,
e-pik-pahani-location-errorखरीप हंगामातील पिकांची ई-पीक पाहणी व नोंदणी करताना मोबाईल अॅपमधील लोकेशन आणि मॅपच्या तांत्रिक अडचणींमुळे सिंदी रेल्वेच्या शेतकर्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रत्यक्ष शेत आणि ई-पीक नोंदणीच्या अॅपवर दाखविण्यात येणारे लोकेशन यामध्ये तफावत दिसून येते. त्यामुळे अनेकांची पीक नोंदणी रखडली आहे.
ई-पीक पाहणीच्या माध्यमातून शेतकर्यांनी आपल्या शेतातील सोयाबीन, कापूस, तूर यासह विविध पिकांची नोंद करणे अपेक्षित आहे. मात्र, नोंदणी करताना शेतकरी प्रत्यक्ष शेतात उभा राहून लोकेशन घेण्याचा प्रयत्न करीत असताना अॅपमध्ये वेगळेच ठिकाण किंवा चुकीचा मॅप दाखविला जात असल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रत्यक्ष शेत एका ठिकाणी असताना पीक नोंदणीसाठी आवश्यक असलेले लोकेशन दुसर्याच ठिकाणी दोन ते तीन किलोमीटर अंतरावर दाखविले जात आहे.
या तांत्रिक अडचणीमुळे अनेकवेळा शेतकर्यांना पुन्हा पुन्हा शेतात जावे लागत असून, नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळ आणि श्रम खर्ची पडत आहेत. विशेषतः शेतकर्यांना मोबाईल नेटवर्कची समस्या असल्यास अडचणीत आणखी भर पडत आहे. पीक नोंदणी शेतकर्यांसाठी महत्त्वाची प्रक्रिया असल्याने अॅपमधील मॅप व लोकेशनची अचूकता तातडीने तपासणे आवश्यक आहे. चुकीच्या लोकेशनमुळे एखाद्या शेतकर्याची पीक नोंदणी अपूर्ण राहिल्यास भविष्यात त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ, पीकविषयक मदत किंवा इतर प्रशासकीय प्रक्रियेत अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे संबंधित महसूल विभागाने तसेच ई-पीक पाहणी यंत्रणेतील तांत्रिक विभागाने सिंदी रेल्वे शिवारातील मॅप व लोकेशनच्या समस्येची तातडीने दखल घेऊन त्रुटी दूर कराव्यात. ज्या शेतकर्यांची नोंदणी तांत्रिक कारणामुळे रखडली आहे, त्यांना पर्यायी सुविधा उपलब्ध करून देऊन पीक नोंदणीची मुदत संपण्यापूर्वी सर्व नोंदी पूर्ण करून घ्याव्यात, अशी मागणी शेतकर्यांकडून होत आहे.