ओडिशावर पुराचे संकट; 13 जिल्ह्यांत पाणीच पाणी

395 मदत शिबिरे सुरू

    दिनांक :27-Sep-2026
Total Views |
दिसपूर,
Flood crisis in Odisha ओडिशाच्या अनेक भागांत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढला आहे. परिस्थिती गंभीर होऊ नये यासाठी राज्य सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून 70 हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. प्रशासनाकडून 395 मदत शिबिरे उभारण्यात आली असून, गेल्या काही दिवसांतील जोरदार पावसामुळे राज्यातील बहुतांश नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. मुख्यमंत्री मोहन चरण माझी रविवारी (27 सप्टेंबर) दक्षिण ओडिशातील प्रभावित भागांचा हवाई पाहणी दौरा करणार आहेत.
 
 
 
Flood crisis in Odisha
 
'पीटीआय'च्या माहितीनुसार, बालासोर, भद्रक, जाजपूर, मयूरभंज, कालाहांडी, कोरापुट, नबरंगपूर, मलकानगिरी, क्योंझर, नयागड, कंधमाल, बोलांगीर आणि जगतसिंहपूर या 13 जिल्ह्यांमध्ये अचानक आलेला पूर तसेच पाणी साचण्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये किनारपट्टीवरील बालासोर जिल्ह्याची परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. जिल्ह्यातील तीन प्रमुख नद्या धोक्याच्या पातळीच्या वरून वाहत आहेत. रविवारी सायंकाळी 5 वाजता जलेश्वर येथील राजघाटमध्ये सुवर्णरेखा नदीची पाणीपातळी 11.07 मीटर नोंदवण्यात आली, तर धोक्याची पातळी 10.36 मीटर आहे. त्यामुळे भोगराई, जलेश्वर, बालीपाल आणि बस्ता प्रखंडातील गावांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. बुधबलंग नदीही गोविंदपूर येथे राष्ट्रीय महामार्ग-16 जवळ 8.8 मीटरच्या पातळीवर धोक्याच्या चिन्हापेक्षा वर वाहत होती. याशिवाय कंसाबांसा, सोआ आणि गंगाहार या नद्यांनाही पूर आला आहे.
 
मयूरभंज जिल्ह्यातील सिमिलिपाल राष्ट्रीय उद्यान प्रशासनाने देवकुंड पर्यटनस्थळ काही काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मुसळधार पावसामुळे जलधारा आणि नाल्यांमधील पाणी मोठ्या प्रमाणात वाढल्याने पर्यटकांनी अभयारण्यात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. देवकुंडकडे जाणाऱ्या मार्गावरील काही पूल आणि पुलिया वाहून गेल्या आहेत. दरम्यान, बुधबलंग नदीचे पाणी बारीपदा नगरपालिका परिसरातील काही भागांसह बड़साही, बेतनटी, उदला, कप्तीपदा, सारसकाना आणि रासगोविंदपूर प्रखंडांमध्ये पोहोचले आहे. महसूल व आपत्ती व्यवस्थापन मंत्री सुरेश पुजारी यांनी सांगितले की, जलाशयातील अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्यासाठी शनिवारी हिराकुड धरणाचे आणखी 11 दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे आता एकूण 16 दरवाजे खुले करण्यात आले आहेत. छत्तीसगडमधील महानदीच्या वरच्या जलसंधारण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे आणखी दरवाजे उघडण्याची गरज निर्माण झाल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या जलाशयाची पाणीपातळी 629.56 फूट आहे, तर पूर्ण जलाशय पातळी 530 फूट असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. पूरग्रस्त तसेच सखल भागातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.