समोसा-पकोडे विसरा! बिहारचा ‘आलू चॉप’ करून पहा

    दिनांक :27-Sep-2026
Total Views |
नवी दिल्ली,
aloo chop संध्याकाळच्या चहासोबत रोज समोसा, पकोडे किंवा इतर नेहमीचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल, तर यावेळी काहीतरी वेगळे करून पाहता येईल. बिहारच्या रस्त्यांवर लोकप्रिय असलेला ‘आलू चॉप’ हा चटपटीत पदार्थ घरच्या घरी सहज तयार करता येतो. बाहेरून खुसखुशीत आणि आतून मसालेदार बटाट्याचा स्वाद असलेला हा पदार्थ चहासोबत खाण्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.
 
aloo chop
 
 
आलू चॉप तयार करण्यासाठी लागणारे बहुतांश साहित्य घरातील स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असते. त्यामुळे फारशी तयारी न करता कमी वेळात हा पदार्थ बनवता येतो.
आलू चॉपसाठी लागणारे साहित्य
1) ४ ते ५ उकडलेले बटाटे,
2) १ कप बेसन,
3) १ बारीक चिरलेला कांदा,
4) २ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या,
5) १ छोटा चमचा आले-लसूण पेस्ट आणि २ मोठे चमचे चिरलेली कोथिंबीर घ्यावी. 
अर्धा छोटा चमचा हळद, अर्धा छोटा चमचा लाल मिरची पूड, अर्धा छोटा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड, अर्धा छोटा चमचा गरम मसाला, १ छोटा चमचा आमचूर पूड किंवा चाट मसाला आणि चवीनुसार मीठ आवश्यक आहे. चॉप तळण्यासाठी तेल घ्यावे.
अशा पद्धतीने तयार करा आलू चॉप
सर्वप्रथम उकडलेले बटाटे सोलून व्यवस्थित कुस्करून घ्या. त्यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्यावी. त्यानंतर कढईत थोडे तेल गरम करून त्यात कांदा, हिरव्या मिरच्या आणि आले-लसूण पेस्ट घालावी. कांदा हलका सोनेरी होईपर्यंत हे मिश्रण परतून घ्यावे.
आता त्यात कुस्करलेले बटाटे घालून त्यासोबत मीठ, हळद, लाल मिरची पूड, भाजलेल्या जिऱ्याची पूड, गरम मसाला आणि आमचूर पूड किंवा चाट मसाला टाकावा. सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून साधारण दोन मिनिटे परतून घ्यावे. गॅस बंद केल्यानंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर मिसळावी आणि हे मिश्रण थंड होऊ द्यावे.
बटाट्याचे मिश्रण थंड झाल्यानंतर त्याचे छोटे-छोटे गोल आकाराचे चॉप किंवा टिक्की तयार करून घ्यावेत.
यानंतर बेसनाचे पीठ तयार करण्यासाठी एका भांड्यात १ कप बेसन घ्यावे. त्यात थोडे मीठ, चिमूटभर हळद आणि लाल मिरची पूड घालावी. त्यामध्ये थोडे थोडे पाणी टाकत गुळगुळीत आणि मध्यम घट्टसर पीठ तयार करावे. पीठ फार पातळ ठेवू नये, अन्यथा बटाट्याच्या टिक्कीवर बेसनाचे आवरण व्यवस्थित बसणार नाही.
कढईत तेल गरम करून आच मध्यम ठेवावी.aloo chop तयार केलेली बटाट्याची टिक्की एकेक करून बेसनाच्या मिश्रणात बुडवून गरम तेलात अलगद सोडावी. दोन्ही बाजूंनी चांगला सोनेरी रंग येईपर्यंत चॉप तळून घ्यावेत.
चॉप कुरकुरीत झाल्यानंतर ते तेलातून बाहेर काढून पेपर टॉवेलवर ठेवावेत, जेणेकरून अतिरिक्त तेल निघून जाईल.
चटणी आणि चहासोबत घ्या आनंद
गरमागरम आलू चॉप तयार झाल्यानंतर ते कोथिंबीर-पुदिन्याच्या चटणीसोबत किंवा टोमॅटो केचपसोबत सर्व्ह करता येतील. सोबत गरमागरम आल्याचा चहा असेल, तर संध्याकाळच्या नाश्त्याची मजा आणखी वाढेल. समोसा आणि पकोड्यांपेक्षा काहीतरी वेगळे खाण्याची इच्छा असेल, तर बिहारचा हा चटपटीत आलू चॉप घरच्या घरी नक्कीच करून पाहता येईल.