‘छोट्या पोथीचे मोठे पारायण’

२५०१ भक्तांच्या सामूहिक भक्तीने संताजी सभागृह दुमदुमले

    दिनांक :27-Sep-2026
Total Views |
नागपूर,
gajanan-maharaj-parayan-nagpurश्री गजानन महाराज प्रसन्न या जयघोषाने संताजी सांस्कृतिक सभागृह परिसर भक्तिमय झाला. श्री संत गजानन महाराज पारायण सेवा समिती, नागपूरच्या वतीने रविवार, २७ सप्टेंबर रोजी ‘छोट्या पोथीचे मोठे पारायण’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शेकडो भाविकांनी एकत्र येत श्री गजानन महाराजांच्या चरणी भक्तिभावाने पारायण केले.
 
parayn
 
मागील दोन वर्षांपासून समितीच्या वतीने ‘श्री गजानन महात्म्य’ छोट्या पोथीचे मोठे सामूहिक पारायण आयोजित केले जात आहे. यंदा तब्बल २५०१ भक्तांच्या सहभागातून पारायणाचा संकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. सकाळी ८.३० ते ११.३० या वेळेत झालेल्या पारायणामुळे संपूर्ण वातावरणात अध्यात्म, श्रद्धा आणि भक्तीचा अनुभव भाविकांना मिळाला.
 
श्री गजानन महाराजांच्या नामस्मरणासह सामूहिक पठणाने सभागृहात एकात्मतेची आणि भक्तीची अनुभूती निर्माण झाली. ‘एक भक्त, एक पोथी आणि एक संकल्प’ या भावनेतून भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
 
विनायकराव पाचपांडे यांचा जीवनगौरव
या कार्यक्रमात समितीच्या वतीने यंदाचा ‘जीवन गौरव पुरस्कार’ भुसावळ येथील श्री विनायकराव पाचपांडे यांना प्रदान करण्यात आला. त्यांच्या सामाजिक व आध्यात्मिक कार्याचा गौरव यावेळी करण्यात आला.
 
कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी, आमदार कृष्णाजी खोपडे, आमदार निखिल मुंडले, दीनदयाल शोध संस्थान, दिल्लीचे प्रधान सचिव यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.
 
श्री गजानन महाराजांच्या भक्तीचा प्रसार, सामूहिक पारायणाची परंपरा आणि समाजात आध्यात्मिक संस्कार रुजविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सातत्याने राबविला जात असल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
 
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समितीचे अध्यक्ष धनजीभाई चौहान, सचिव गजानन देशपांडे आणि संयोजक सौ. अर्चनाताई ढबाळे यांनी भाविकांचे सहकार्य घेतले.
 
“श्री गजानन महाराजांच्या नामस्मरणात मन रमले की, अंतःकरणाला शांततेचा आणि सकारात्मक ऊर्जेचा अनुभव मिळतो. सामूहिक पारायणातून ही भक्ती अधिक व्यापक होते,” असा भाव यावेळी उपस्थित भक्तांच्या चेहऱ्यावर दिसून आला.