नागपूर,
Ganapati Visarjan Nagpurनागपूर शहरात ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. नागपूर महानगरपालिकेने पर्यावरणपूरक विसर्जनासाठी शहरातील दहाही झोनसह विविध ठिकाणी कृत्रिम तलाव आणि जलकुंडांची व्यवस्था केली होती. पहिल्या दिवसापासून अनंत चतुर्दशीपर्यंत शहरात एकूण १ लाख ५४ हजार ५०६ गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. यामध्ये १ लाख ४५ हजार ८४८ मातीच्या, तर ८ हजार ६५८ पीओपीच्या मूर्तींचा समावेश आहे. विशेषतः अनंत चतुर्दशीच्या दिवशी तब्बल १ लाख २७ हजार ९७१ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

पर्यावरणपूरक विसर्जनाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळावा यासाठी मनपाने २२५ ठिकाणी ४६५ कृत्रिम तलाव व जलकुंड उभारले होते. घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी नागरिकांनी या सुविधेचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. नागरिकांना जवळच्या विसर्जनस्थळांची माहिती सहज मिळावी यासाठी मनपाने क्यूआर कोड आणि संकेतस्थळाची सुविधाही उपलब्ध करून दिली. महापौर निता ठाकरे, मनपा आयुक्त डॉ. विपीन यांच्यासह पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी पर्यावरणपूरक विसर्जन व्यवस्थेची पाहणी केली. विसर्जनस्थळांवर मनपाचे १ हजार ३४ कर्मचारी कार्यरत होते, तर पोलिसांकडूनही प्रमुख मार्ग आणि विसर्जनस्थळांवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.
गणेशोत्सव काळात मनपाकडून पूजेनंतरचे १६३.७५ टन निर्माल्य स्वतंत्रपणे संकलित करण्यात आले असून, त्यापासून खतनिर्मिती करण्यात येणार आहे. पर्यावरणपूरक विसर्जन अभियानात मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागासोबत ग्रीन व्हिजीलसह विविध स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांनीही सहभाग घेतला. कृत्रिम तलावांमुळे नैसर्गिक जलस्रोतांवरील ताण कमी करण्यासोबतच गणेश विसर्जन अधिक पर्यावरणपूरक पद्धतीने पार पडल्याचे मनपाच्या व्यवस्थेतून दिसून आले.