गणेशोत्सवात मेट्रो कर्मचाऱ्यांची तत्पर सेवा

गर्दीचे नियोजन, सातत्याने सूचना, तिकीट स्कॅनिंगपासून वैद्यकीय मदत

    दिनांक :27-Sep-2026
Total Views |
पुणे, 
ganeshotsav 2026गणेशोत्सवाच्या काळात पुणे मेट्रोने लाखो भाविकांना सुरक्षित आणि सुरळीत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली. या काळात मेट्रोच्या दोन्ही मार्गांवरील सर्व स्थानकांवरील कर्मचाऱ्यांनी प्रवाशांच्या सेवेसाठी विशेष मेहनत घेतली. गर्दीचे नियोजन, भाविकांना मार्गदर्शन, तिकीट स्कॅनिंग, सुरक्षेच्या सूचना तसेच गरज भासल्यास वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यापर्यंत कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने सेवा बजावली. त्यामुळे मेट्रोचा प्रवास केवळ वेगवानच नव्हे, तर भाविकांसाठी अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर ठरला.

metro 
स्थानकांवर काही कर्मचाऱ्यांना माईक देण्यात आले होते. या माईकच्या माध्यमातून भाविकांना सातत्याने सूचना देण्यात येत होत्या. गर्दीत धावपळ करू नये, रांगेतून प्रवास करावा, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांची काळजी घ्यावी, स्थानकाच्या प्रवेश-निर्गमन मार्गात अडथळा निर्माण करू नये, अशा विविध सूचना वेळोवेळी दिल्या जात होत्या. गर्दीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कर्मचारी सतर्क होते.
 
तिकीट खरेदी केल्यानंतर प्रवेशद्वारावर तिकीट स्कॅन करताना काही भाविकांना अडचणी येत होत्या. अशा वेळी कर्मचारी स्वतः पुढे येऊन भाविकांना मदत करीत होते. अनेकांना स्कॅनिंगची प्रक्रिया समजावून सांगत त्यांचा प्रवास सुलभ करण्यात आला. गर्दीच्या काळात प्रत्येक प्रवाशाला शक्य तितक्या कमी वेळेत प्रवेश मिळावा, यासाठीही कर्मचाऱ्यांकडून प्रयत्न करण्यात आले.
 
-------------------------
भाविकांना सुरक्षित घरी पोहोचवणे हेच समाधान
गणेशोत्सवातील गर्दीचा अनुभव सांगताना एका मेट्रो कर्मचाऱ्याने सांगितले, “गणेशोत्सवापूर्वी आम्हाला गर्दीच्या काळात काय करायचे, याबाबत प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यामुळे प्रत्यक्ष गर्दीच्या वेळी प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाणे सोपे झाले. दिवसभर मोठी गर्दी असली तरी भाविकांना योग्य मार्गदर्शन करून त्यांचा प्रवास सुखकर करता आला, याचे समाधान आहे.”
------------------------