मराठी सिनेमासाठी मानधनाची अट नाही’

गश्मीर महाजनीने सांगितला काम निवडण्याचा फॉर्म्युला

    दिनांक :27-Sep-2026
Total Views |
मुंबई
gashmeer mahajani मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता गश्मीर महाजनी सध्या ‘१०८ बेस हॉस्पिटल- उरी’ या हिंदी मालिकेतील भूमिकेमुळे चर्चेत आहे. अभिनयासोबतच नृत्यकौशल्यामुळेही त्याची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. मराठी सिनेमा, हिंदी मालिका आणि वेब सीरिज अशा विविध माध्यमांमध्ये काम करताना प्रकल्पांची निवड आणि मानधनाबाबतचा आपला दृष्टिकोन गश्मीरने स्पष्ट केला आहे. विशेष म्हणजे, मराठी चित्रपटांसाठी आपण मानधनाची कोणतीही ठरावीक अट ठेवत नसल्याचे त्याने सांगितले.
 

gashmeer mahajani says he does not demand fees for marathi films 
‘१०८ बेस हॉस्पिटल- उरी’ या मालिकेत गश्मीर मेजर डॉ. मनोज जैसवाल ही व्यक्तिरेखा साकारत आहे. या भूमिकेविषयी बोलताना त्याने सांगितले की, आयुष्यात एकदा तरी लष्कराचा गणवेश परिधान करण्याची त्याची इच्छा होती आणि या मालिकेमुळे ती पूर्ण झाली. मालिकेचे मर्यादित भाग असणे हा प्रकल्प स्वीकारण्यामागील महत्त्वाचा निकष असल्याचेही त्याने स्पष्ट केले.
गश्मीरच्या मते, दीर्घकाळ चालणाऱ्या हिंदी मालिकांना वर्षानुवर्षे वेळ द्यावा लागू शकतो. त्यामुळेच मधल्या काळात त्याने हिंदी मालिकांपासून अंतर ठेवले होते. मालिका हे प्रभावशाली माध्यम असून, या माध्यमातून आपले काम प्रेक्षकांपर्यंत पोहोचावे असे त्याला वाटते. मात्र, त्यासाठी मालिका मर्यादित भागांची असावी, अशी त्याची अपेक्षा आहे. वर्षभरापेक्षा अधिक काळ द्यावा लागणारे प्रकल्प स्वीकारत नसल्याचेही त्याने स्पष्ट केले. त्याच्याकडे येणाऱ्या प्रस्तावांपैकी कलाकार म्हणून स्वतःला सर्वाधिक वाव मिळणाऱ्या कामाला तो प्राधान्य देतो.
या मालिकेच्या निमित्ताने काश्मीरमध्ये प्रत्यक्ष लोकेशन्सवर चित्रीकरण करण्याची संधीही गश्मीरला मिळाली. यापूर्वी तो काश्मीरला गेला नव्हता. मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान काही संवेदनशील भागांमध्येही शूटिंग करण्यात आले. त्यावेळी भारतीय जवानांकडून मोठी मदत आणि वेळोवेळी मार्गदर्शन मिळाल्याचे त्याने सांगितले. राष्ट्रीय रायफल्सच्या अखत्यारीत काही चित्रीकरण करण्यात आल्याचेही त्याने नमूद केले.
विविध माध्यमांमध्ये काम gashmeer mahajani  करताना मराठी चित्रपटांना आपण प्राधान्य देत असल्याचे गश्मीरने स्पष्ट केले. मराठी चित्रपटांनंतर हिंदीतील कामांचा विचार करतो, असे त्याने सांगितले. मात्र, मराठी चित्रपट करताना मानधनाची ठरावीक रक्कम मागण्याची आपली पद्धत नसल्याचे त्याने विशेषत्वाने नमूद केले.मराठी चित्रपटासाठी किती मानधन हवे, अशी अट आपण निर्मात्यांसमोर ठेवत नसल्याचे गश्मीर म्हणाला. आतापर्यंत त्याने केलेल्या मराठी चित्रपटांच्या निर्मात्यांकडून आधी चित्रपटाचे बजेट समजून घेतले आणि त्यानुसार काम केल्याचे त्याने सांगितले. मराठी चित्रपटांचे बजेट तुलनेने मर्यादित असते. अशा परिस्थितीत बजेटमधील मोठा हिस्सा कलाकारांच्या मानधनावर खर्च झाल्यास चित्रपटाच्या प्रसिद्धीसह इतर महत्त्वाच्या बाबींवर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आपण कमीत कमी मानधन स्वीकारत असल्याचे गश्मीरने स्पष्ट केले.आपल्या मातृभाषेतील चित्रपटसृष्टीला पुढे नेण्यासाठी कलाकारांनीही योगदान दिले पाहिजे, हा या भूमिकेमागचा उद्देश असल्याचे त्याने सांगितले. अर्थात, केवळ बजेटच नव्हे, तर चित्रपटाचा विषय आणि तो प्रकल्प कोणत्या टीमकडून केला जात आहे, हे घटकही आपल्या निर्णयात महत्त्वाचे असल्याचे त्याने स्पष्ट केले.दरम्यान, गश्मीर महाजनीने आगामी ‘राखणदार’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. अभिनयासोबत दिग्दर्शनाच्या भूमिकेत त्याने साकारलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, याकडे आता लक्ष लागले आहे.