सातासमुद्रापार नेदरलँड्समध्ये ‘ग्लोबल गणेश फेस्टिव्हल २०२६’ उत्साहात

    दिनांक :27-Sep-2026
Total Views |
नागपूर,
global-ganesh-festivalमहाराष्ट्राच्या मातीत रुजलेला गणेशोत्सवाचा उत्साह सातासमुद्रापार नेदरलँड्समध्येही अनुभवायला मिळाला. युथॉर्न येथे सलग दुसऱ्या वर्षी ‘वि द पीपल’च्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या ‘ग्लोबल गणेश फेस्टिव्हल २०२६’मध्ये २०० हून अधिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. मराठमोळी परंपरा, भारतीय संस्कृती आणि विविध देश-प्रांतांतील नागरिकांचा सहभाग यामुळे हा उत्सव विविध संस्कृतींना जोडणारा आनंदसोहळा ठरला.
 
global
 
मूळचे नागपूरकर आणि गेल्या १३ वर्षांपासून नेदरलँड्समध्ये वास्तव्यास असलेले अमित काशीकर यांच्या पुढाकारातून हा उपक्रम आकाराला आला. परदेशात राहूनही भारतीय संस्कृतीशी नाळ कायम ठेवण्यासोबतच विविध पार्श्वभूमीच्या नागरिकांना एका व्यासपीठावर आणण्याच्या उद्देशाने त्यांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर २०२५ मध्ये ‘वि द पीपल’ची स्थापना केली. ‘एकत्र येणे, योगदान देणे आणि समाजासाठी काहीतरी चांगले घडवणे’ या विचारातून संस्था विविध उपक्रम राबविते. भारतीय तसेच अन्य समुदायांमध्ये संवाद वाढविणे, सांस्कृतिक वारसा जपणे आणि प्रत्येकाला आपलेपणाची भावना देणे, हा संस्थेचा उद्देश आहे.
 
ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे स्वागत
उत्सवाची सुरुवात शाडूच्या गणेशमूर्तीच्या विधिवत प्रतिष्ठापनेने झाली. जर्मनीहून विशेष आलेल्या ‘ओम ढोल-ताशा पथका’ने ढोल-ताशांच्या गजरात गणरायाला मानवंदना दिली. गणेशपूजा आणि सामूहिक आरतीने वातावरण भक्तिमय झाले. त्यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम, कलाविष्कार, स्पर्धा आणि मनोरंजक उपक्रमांनी उत्सवात रंग भरला. भारतातील विविध प्रांतांतील खाद्यपदार्थांचाही उपस्थितांनी आस्वाद घेतला. मूळच्या नागपूरच्या आणि ‘वि द पीपल’शी जोडलेल्या अनुजा कुंजलवार यांनी उत्साहपूर्ण सूत्रसंचालन केले. त्यांना शर्मिला यांनी साथ दिली.
 
आव्हानांतून नाते अधिक घट्ट
यंदाचा उत्सव अनेक अनपेक्षित आव्हानांमधून पार पडला. नियोजनातील बदल, पडद्यामागील धावपळ आणि विविध अडचणी असूनही आयोजक, स्वयंसेवक, कलाकार, सहकारी आणि स्टॉलधारक यांनी परस्परांच्या साथीने सर्व आव्हानांवर मात केली. “भारतीय परंपरा पुढे नेण्याबरोबरच गणेशोत्सवाच्या माध्यमातून विविध संस्कृतींना एकत्र आणणे, हा आमचा प्रयत्न आहे. या उत्सवात ‘वसुधैव कुटुंबकम्’ची भावना प्रत्यक्ष अनुभवायला मिळाली. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजाला एकत्र आणण्याचा विचार रुजवला. त्याची छोटीशी अनुभूती या आयोजनातून मिळाली,” असे अमित काशीकर यांनी सांगितले. उत्सवाच्या यशामागे ‘वि द पीपल’च्या संचालक मंडळातील शीतल काशीकर, मनीष गुप्ता, रोहित झांब आणि त्रिप्ती गुप्ता यांच्यासह अनिश, सचिन गुप्ता, आकृती, अनुजा कुंजलवार, प्रशांत, हरिका, शर्मिला, चंद्रमौली आणि अन्य सहकाऱ्यांचे योगदान राहिले. अक्षय इजदार यांनी छायाचित्रणातून उत्सवातील अविस्मरणीय क्षण टिपले. कुटुंबांसह सहभागी झालेली मंडळी, उत्साहाने सहभागी झालेली मुले, विविध संस्कृतींमधून आलेले मित्र आणि नव्याने जोडली गेलेली नाती यामुळे उत्सवाला विशेष ऊब मिळाली. माती महाराष्ट्राची, भूमी नेदरलँड्सची आणि भावना मात्र वैश्विक—असा ‘ग्लोबल गणेश फेस्टिव्हल २०२६’चा अनुभव उपस्थितांनी घेतला.