मुंबई
govinda and sunita ahuja अभिनेता गोविंदाच्या वैयक्तिक आयुष्याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चांना उधाण आले आहे. गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनीता आहुजा यांच्यातील मतभेद पुन्हा एकदा सार्वजनिक चर्चेचा विषय ठरले आहेत. त्यातच गोविंदाची आगामी चित्रपटातील सहअभिनेत्री कोमल राणी स्वर्णकार हिच्यासोबतच्या कथित जवळिकीच्या चर्चा सुरू असल्याने या प्रकरणाला आणखी रंग चढला आहे. आता कोमल राणीने सुनीता आहुजाच्या वक्तव्यांवर सोशल मीडिया पोस्टद्वारे प्रतिक्रिया दिली आहे.
शनिवारी कोमल राणीने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर सविस्तर पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये तिने सुनीता आहुजाच्या वक्तव्यांवर तीव्र शब्दांत आक्षेप घेतला. कोमलने म्हटले की, अनेक वर्षांपासून स्वतःच्या पतीला त्रास देत असल्याचा आरोप ज्या स्त्रीवर आहे, तिच्या शापाचा कोणावरही परिणाम होणार नाही. तसेच आधीच तुटलेल्या घराला दुसरी व्यक्ती तोडू शकत नाही, असा दावाही तिने केला. कोणीतरी ‘कावळा कान घेऊन गेला’ असे सांगितल्यावर लोक त्याच्या मागे धावत नाहीत, अशा आशयाची टिप्पणीही तिने केली.
आपल्या वैयक्तिक आयुष्यातील बाबी सार्वजनिक करण्यामागे नेमका उद्देश काय, असा सवालही कोमलने उपस्थित केला. परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करण्याऐवजी ती सार्वजनिक करून त्यातून आनंद घेण्यामागे कोणत्या प्रकारची वेदना किंवा हेतू आहे, असा प्रश्न तिने केला. ही खरोखरची वेदना आहे की पूर्वनियोजित कारस्थान, अशी शंकाही तिने व्यक्त केली.कोमलने आपल्या पोस्टमध्ये पुढे असा आरोप केला की, एखाद्या पुरुषाला सातत्याने मानसिक त्रास देणे, त्याला काम करण्यापासून रोखणे, घरी बसवणे, त्याला एकटे पाडणे आणि त्याच्या आयुष्यावर गंभीर परिणाम होईल अशा परिस्थितीत ढकलणे योग्य ठरू शकत नाही. पतीवर प्रेम करणारी पत्नी अशा प्रकारे वागेल का, असा सवालही तिने उपस्थित केला. तसेच बंद दाराआड साध्य न होणाऱ्या गोष्टी लोकांची सहानुभूती मिळवून सार्वजनिक पातळीवर साध्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे का, अशी शक्यताही तिने मांडली.याच पोस्टच्या माध्यमातून कोमल राणीने सुनीता आहुजाला आपले नाव स्वतःचा अजेंडा पुढे नेण्यासाठी वापरू नये, असा इशाराही दिला. पोस्टच्या शेवटी तिने देवाने अशा धूर्त स्त्रियांपासून प्रत्येक चांगल्या पुरुषाचे रक्षण करावे, अशी टिप्पणी केली. सुनीता आहुजाने govinda and sunita ahuja दक्षिणेश्वर काली मंदिराला भेट दिल्यानंतर कोमलची ही पोस्ट समोर आली आहे.दरम्यान, सुनीता आहुजाने शुक्रवारी कोलकात्याजवळील दक्षिणेश्वर काली मंदिराला भेट दिली होती. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना तिने तरुण-तरुणी आणि महिलांना आपल्याला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. आपल्या आयुष्यात जे काही घडत आहे ते योग्य नसून, विनाकारण आपले घर उद्ध्वस्त होत असल्याचे तिने म्हटले होते.
गोविंदा आणि सुनीता यांच्यातील मतभेदांच्या चर्चांना गणेशोत्सवाच्या काळात अधिक जोर आला. गोविंदा सुनीताऐवजी सहअभिनेत्री कोमल राणीला घेऊन लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेल्याचे समोर आले होते. त्याच दिवशी सुनीताही लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेली होती; मात्र ती एकटीच होती. या घटनांनंतर गोविंदा आणि कोमल राणी यांच्या कथित नात्याबाबत सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले. मात्र, दोघांच्या नात्याबाबत सुरू असलेल्या चर्चांवर अधिकृतपणे कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.