डिझेलला ‘ब्रेक’,एलएनजीला ‘ग्रीन सिग्नल’

देशात पहिली ड्युअल फ्युएल ट्रेन धावणार

    दिनांक :27-Sep-2026
Total Views |
साबरमती
train रेल्वेच्या इंधन वापरात बचत करण्याच्या दृष्टीने देशात प्रथमच एलएनजी आणि डिझेल या दोन्ही इंधनांवर धावणारी ड्युअल फ्युएल DEMU ट्रेन आज, २७ सप्टेंबर रोजी सेवेत दाखल होणार आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या हस्ते साबरमती स्थानकावरून या विशेष ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. ही ट्रेन साबरमती-पाटण मार्गावर धावणार असल्याची माहिती आहे.
 

India first LNG-diesel dual fuel demu train to run on Sabarmati-patan route 
या प्रकल्पात एलएनजीचा वापर केल्यामुळे डिझेलच्या वापरात सुमारे ४० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे रेल्वेच्या इंधन खर्चात बचत करण्याबरोबरच पारंपरिक डिझेलवरील अवलंबित्व कमी करण्याच्या प्रयत्नांना या प्रयोगातून चालना मिळण्याची अपेक्षा आहे.या ड्युअल फ्युएल तंत्रज्ञानासाठी साबरमती डेपोत दोन ड्रायव्हिंग पॉवर कारमध्ये आवश्यक यंत्रणा बसवण्यात आली आहे. या दोन्ही कार प्रत्येकी १,४०० हॉर्सपॉवर क्षमतेच्या आहेत.एलएनजी आणि डिझेल या दोन्ही इंधनांचा वापर करण्यास सक्षम अशी ही प्रणाली रेल्वेच्या विद्यमान डिझेल इंजिन तंत्रज्ञानासोबत कार्य करण्यासाठी विकसित करण्यात आली आहे.देशातील पहिल्या एलएनजी डिझेल ड्युअल फ्युएल DEMUच्या या प्रयोगाकडे रेल्वेच्या इंधन कार्यक्षमतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पाहिले जात आहे. एलएनजीच्या वापरामुळे डिझेलची गरज कमी झाल्यास भविष्यात रेल्वेच्या इंधन वापरात आणि खर्चात बचत करण्याच्या प्रयत्नांना त्याचा फायदा होऊ शकतो. साबरमती-पाटण मार्गावरील या ट्रेनच्या संचालनातून या तंत्रज्ञानाच्या प्रत्यक्ष वापराचा अनुभवही मिळणार आहे.