३२व्या वर्षी ग्रीव्ह्सची ‘शतकी’ एन्ट्री!

    दिनांक :27-Sep-2026
Total Views |
तिरुवनंतपुरम,
India vs West Indies भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा ३२ वर्षीय फलंदाज जस्टिन ग्रीव्ह्सने कारकिर्दीतील पहिले शतक झळकावत खास विक्रम आपल्या नावावर केला. ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळताना ग्रीव्ह्सने १०४ चेंडूंत शतक पूर्ण केले. या कामगिरीसह वेस्ट इंडिजकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिले शतक करणाऱ्या सर्वाधिक वयाच्या फलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
 
India vs West Indies
  
ग्रीव्ह्सने भारतीय गोलंदाजांचा संयमाने सामना करत आपल्या डावाला आकार दिला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये दीर्घकाळ खेळल्यानंतर त्याच्या बॅटमधून आलेले हे पहिले शतक ठरले. वेस्ट इंडिजच्या डावाला मजबूत करण्यामध्ये त्याची खेळी महत्त्वाची ठरली. या सामन्यात त्याने जॉन कॅम्पबेलसोबत १३५ धावांची सलामीची भागीदारीही केली. भारताच्या भूमीवर भारताविरुद्ध वेस्ट इंडिजच्या सलामीच्या जोडीने केलेल्या सर्वोच्च भागीदारीच्या यादीत कॅम्पबेल आणि ग्रीव्ह्स यांची १३५ धावांची भागीदारी तिसऱ्या क्रमांकावर आहे. यापूर्वी १९८८ मध्ये त्रिवेंद्रम येथे गॉर्डन ग्रीनिज आणि फिल सिमन्स यांनी १६४ धावांची भागीदारी केली होती. त्यानंतर १९८३ मध्ये इंदूर येथे गॉर्डन ग्रीनिज आणि डेसमंड हेन्स यांनी १४९ धावा जोडल्या होत्या.
 
वेस्ट इंडिजकडून पहिले एकदिवसीय शतक करणाऱ्या सर्वाधिक वयाच्या फलंदाजांमध्ये क्लेटन लॅम्बर्ट ३६ वर्षे ५७ दिवसांच्या वयात १९९८ मध्ये इंग्लंडविरुद्ध ११९ धावांची खेळी करून आघाडीवर आहेत. शामर ब्रूक्स यांनी ३३ वर्षे २४६ दिवसांच्या वयात २०२२ मध्ये नेदरलँड्सविरुद्ध नाबाद १०१ धावा केल्या होत्या. आता ३२ वर्षे २१३ दिवसांच्या वयात ग्रीव्ह्सने भारताविरुद्ध नाबाद १०० धावा करत या यादीत तिसरे स्थान मिळवले आहे. ट्रॅव्हिस डाउलिन यांनी ३२ वर्षे १५४ दिवसांच्या वयात २००९ मध्ये बांगलादेशविरुद्ध नाबाद १०० धावा केल्या होत्या. दरम्यान, जॉन कॅम्पबेलनेही या सामन्यात अर्धशतक पूर्ण केले होते. मात्र, डावाच्या २०व्या षटकात कुलदीप यादवने त्याला बाद केले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये कॅम्पबेलची ५० पेक्षा अधिक धावांची ही दुसरी खेळी ठरली. त्यानंतर ग्रीव्ह्सने आपले पहिले शतक पूर्ण करत कॅम्पबेलसोबतची भागीदारी आणि स्वतःची खेळी विशेष ठरवली.