कोकण रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाला वेग

गोव्यात दोन नवीन बोगदे होणारमंगळूरहून गोव्यापर्यंत आणि गोवा ते वैभववाडीपर्यंतच्या मार्गाचे सर्वेक्षण

    दिनांक :27-Sep-2026
Total Views |
सिंधुदुर्ग,
konkan railway doublingकोकण रेल्वे लोहमार्गाच्या दुपदरीकरणाच्या कामाला गती देण्यासाठी पेडणे आणि जुनेगोवे येथे नव्याने बोगदे खोदण्यात येणार आहेत. या कामासाठी रेल्वे मंत्रालयाने निधी मंजूर केला असल्याची माहिती नुकतीच कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांनी दिली. ते म्हणाले, लोहमार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. यामुळे इंधनावरील वार्षिक १९० कोटी रुपयांची बचत होत आहे. आता लोहमार्ग दुपदरी करण्यासाठी मंगळूरहून गोव्यापर्यंत आणि गोवा ते वैभववाडीपर्यंतच्या टप्प्याचे सर्वेक्षण सुरू आहे. त्यानंतर प्रकल्प अहवाल तयार करून त्याला मंत्रालयाची मंजुरी घेण्यात येणार आहे. पेडणे व जुनेगोवे येथे बोगदे त्यासाठी बांधावे लागतील. त्याकामासाठी आधीच रेल्वे मंत्रालयाने निधी मंजूर केला आहे.

kokan
 
कोलाड ते सुरतकल या मार्गावर ट्रक वाहून नेणारी रोरो सेवा चालवली जाते. आता ऑक्टोबरपासून मासिक १२ फेऱ्यांऐवजी ४६ फेऱ्या या सेवेच्या असतील. त्याशिवाय ५७ टनी ट्रक वाहून नेण्यात येतील, अशी माहिती देऊन ते म्हणाले, कोकण रेल्वेने महसूल वाढीवर भर दिला आहे. त्यासाठी २३ हजार ५०० कोटी रुपयांची कामे मिळवण्यात आली आहेत.
 
 
बोगदे खोदणे, लोहमार्गांचे विद्युतीकरण करणे, पूल बांधणे आदी कामांत कोकण रेल्वेने निपुणता मिळवली आहे. त्याआधारे ही कामे मिळवली आहेत. देशातील काही भागांतील लोहमार्गांच्या विद्युतीकरणाचे काम कोकण रेल्वेला मिळाले आहे. येत्या सहा महिन्यांत अशी १५ हजार कोटी रुपयांची कामे आणखीन मिळतील असे सांगून ते म्हणाले, कॉंगो येथील मेट्रोचे काम लवकरच सुरु केले जाईल. दुबई मेट्रोच्या निविदा प्रक्रियेत सहभाग आहे.
 
८५०० कोटींची कामे
देशभरात रेल्वे बांधकामाची ८५०० कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. प्रवासी सुविधा वाढीवर यंदा २१ कोटी रुपये खर्च केले जातील, तीन वर्षात ४५ कोटी रुपये खर्च केले. पाच वर्षांनी कोकण रेल्वे मार्गांवर दररोज १०० हून अधिक गाड्या धावतील असे नियोजन आहे.
 
कोकण रेल्वे कर्जमुक्त
कोकण रेल्वेने प्रकल्पासाठी रोखे बाजारातून घेतलेले कर्जाची परतफेड करण्यात येत असून २२ सप्टेंबर रोजी शेवटचे ३०० कोटी रुपये फेडले जातील असे झा यांनी सांगितले. कोविडची दोन वर्षे वगळता कोकण रेल्वे नफ्यात असून, गेल्या तीन वर्षांत ३२३, १३८ व १९९ कोटी रुपये अनुक्रमे नफा झाला आहे. पाच वर्षांनी नफ्याचे प्रमाण वार्षिक ३०० कोटी रुपये असेल, असे ते म्हणाले.