पंजाब
lpu campus पंजाबमधील फगवाडा येथील नामांकित लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (LPU)मध्ये रविवारी पहाटे विद्यार्थ्यांच्या हिंसक आंदोलनामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. एका विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा दावा सोशल मीडियावर वेगाने प्रसारित झाल्यानंतर मोठ्या संख्येने विद्यार्थी कॅम्पसमध्ये एकत्र आले. संतप्त विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या परिसरातील मालमत्तेची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. खिडक्यांच्या काचा फोडण्यासह कुंड्यांची नासधूस करण्यात आली, तर काही वस्तूंना आगही लावण्यात आली. दरम्यान, आंदोलकांनी जालंधर-फगवाडा राष्ट्रीय महामार्गही रोखून धरल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, पोलिसांच्या प्राथमिक तपासात विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची कोणतीही घटना घडल्याचे आढळून आले नसल्याचे कपूरथलाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (SSP) गौरव तुरा यांनी स्पष्ट केले. त्यांच्या माहितीनुसार, रविवारी पहाटे सुमारे 1.45 वाजता विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी जमा झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सोशल मीडियावर पसरलेल्या अफवांमुळेच हा गोंधळ निर्माण झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली असून, विद्यापीठ परिसरात सध्या कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, या आंदोलनामागे केवळ सोशल मीडियावरील अफवा कारणीभूत नसून, विद्यापीठ प्रशासनाविरोधात विद्यार्थ्यांमध्ये आधीपासूनच असंतोष असल्याचेही समोर आले आहे. आंदोलक विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतर SSP गौरव तुरा यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या विविध अंतर्गत तक्रारी आणि समस्या योग्य पद्धतीने सोडवल्या जात नसल्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली होती. प्रशासनाविरोधातील हा असंतोष दीर्घकाळापासून होता आणि सोशल मीडियावरील अफवेच्या निमित्ताने तो उफाळून आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आंदोलनादरम्यान झालेल्या lpu campus तोडफोडीमुळे विद्यापीठाच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले असून, या नुकसानीचे मूल्यांकन सध्या सुरू आहे. हिंसाचार आणि तोडफोडीत सहभागी असलेल्या उपद्रवी घटकांविरोधात आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, पंजाबमधील शैक्षणिक संस्थांमध्ये सोशल मीडियावरून पसरलेल्या चुकीच्या माहितीमुळे तणाव निर्माण होण्याची ही अवघ्या 24 तासांतील दुसरी घटना आहे. यापूर्वी पतियाळा येथील चित्कारा युनिव्हर्सिटीमध्ये दोन विद्यार्थिनींनी आत्महत्या केल्याच्या चुकीच्या बातम्या सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी तीव्र निदर्शने केली होती. त्या आंदोलनादरम्यान पोलिसांच्या वाहनाचीही तोडफोड करण्यात आली होती. या घटनेनंतर अवघ्या एका दिवसात LPU कॅम्पसमध्ये अफवेच्या पार्श्वभूमीवर हिंसक आंदोलन झाल्याने पंजाबमधील विद्यापीठांच्या सुरक्षा व्यवस्थेसोबतच सोशल मीडियावरील अफवांना वेळीच आळा घालण्याचे आव्हान पुन्हा अधोरेखित झाले आहे.