रुग्णालयाच्या ढिगाऱ्यातून मुज्तबा खामेनी बाहेर!

    दिनांक :27-Sep-2026
Total Views |
तेहरान,
mojtaba-khamenei इराणचे सर्वोच्च नेते मुज्तबा खामेनी यांना तेहरानमधील एका रुग्णालयावर झालेल्या हल्ल्यानंतर ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आल्याचा दावा इराणच्या तज्ज्ञ सभेचे सदस्य मोहसेन हैदरी यांनी केला आहे. कतारी दूरचित्रवाणी वाहिनी ‘अल अरबी’ला दिलेल्या मुलाखतीत हैदरी यांनी हा दावा केला असून, त्यांच्या वक्तव्याचा हवाला देत ‘न्यूयॉर्क पोस्ट’ने यासंदर्भात वृत्त दिले आहे. या दाव्याची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही.
 
mojtaba-khamenei
 
हैदरी यांच्या म्हणण्यानुसार, याआधी झालेल्या हल्ल्यात जखमी झाल्यानंतर मुज्तबा खामेनी यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तेहरानमधील तीन रुग्णालयांना बॉम्बहल्ल्यांचे लक्ष्य करण्यात आले. यातील तिसऱ्या रुग्णालयात मुज्तबा खामेनी उपचार घेत होते आणि हल्ल्यानंतर त्यांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आल्याचे हैदरी यांनी सांगितले. त्यानंतर त्यांना अज्ञात ठिकाणी हलवण्यात आल्याचे वृत्त आहे.
 
दरम्यान, मुज्तबा खामेनी यांची इराणच्या सर्वोच्च नेतेपदी निवड कशी झाली, याबाबतही हैदरी यांनी माहिती दिल्याचे वृत्त आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ८ मार्च रोजी झालेल्या प्रक्रियेची अधिकृत घोषणा दूरचित्रवाणीवर होईपर्यंत मुज्तबा खामेनी यांना आपल्या निवडीची माहिती नव्हती. सर्वोच्च नेत्याची निवड करणाऱ्या तज्ज्ञ सभेच्या कोम येथील सचिवालयावरही हल्ला झाला होता. या हल्ल्यात आठ जण ठार झाल्याचे आणि निवडीशी संबंधित कागदपत्रे नष्ट झाल्याचे वृत्त आहे. त्यानंतर सदस्यांनी कागदावर मतदान केले आणि त्यांना एका गुप्त ठिकाणी बैठकीसाठी बोलावण्यात आल्याचे हैदरी यांनी सांगितले.
 
या निवड प्रक्रियेत मुज्तबा खामेनी यांना ५९ पैकी ५० मते मिळाल्याचे हैदरी यांच्या हवाल्याने सांगण्यात आले आहे. अयातुल्ला अलीरेझा अराफी यांना आठ मते मिळाली, तर एका सदस्याने मतदान केले नाही. मुज्तबा खामेनी यांनी यापूर्वी इराण सरकारमध्ये कोणतेही राजकीय पद भूषवले नव्हते, मात्र त्यांनी वडील अयातुल्ला अली खामेनी यांचे सल्लागार म्हणून काम केल्याचे वृत्त आहे.
 
मुज्तबा खामेनी यांच्या प्रकृतीबाबत यापूर्वीही वेगवेगळे दावे समोर आले आहेत. त्यांच्या फेब्रुवारीतील हल्ल्यात गंभीर जखमा झाल्याचे काही अहवालांत म्हटले होते, तर इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियन यांनी ते निरोगी असल्याचे सांगितल्याचे वृत्त आहे. त्यामुळे रुग्णालयावरील हल्ल्यातून त्यांना वाचवण्यात आल्याच्या नव्या दाव्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबतची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.