नागपूर,
nagpur music festदि ब्लाइंड रिलीफ असोसिएशन, पं. गोपाळराव वाडेगांवकर शिष्य परिवार आणि सप्तक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पं. गोपाळराव वाडेगावकर स्मृती संगीत समारोहाचा पहिला दिवस सतार-तबल्याची जुगलबंदी व पं. भुवनेश कोमकलीच्या गायकीने गाजला. दि ब्लाइंड रिलीफ असोसिएशनच्या प्लॅटिनम ज्युबिली हॉलमध्ये शनिवारी सुरू झालेल्या या महोत्सवाचे उद्घाटन मॉरिस कॉलेजच्या संगीत विभागप्रमुख डॉ. साधना शिलेदार यांच्या हस्ते झाले.
पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्राची सुरुवात तबला वादक विरथ वाडेगांवकर व संदेश पोपटकर तसेच, सतारवादक डॉ. उदय गुप्ते आणि डॉ. श्रीराम काणे यांच्या वादनाने झाली. राग यमनच्या मधुर स्वरांनी सतारीच्या सादरीकरणाला सुरुवात झाली. त्यानंतर तबल्याच्या तालबद्ध साथीने सादरीकरणात रंगत आली. सतार आणि तबल्यातील स्वर-तालाचा संवाद, प्रश्नोत्तराच्या शैलीतील जुगलबंदी आणि वाढत्या लयीतील प्रभावी सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध झाले.
दुसऱ्या सत्रात गायक भुवनेश कोमकली यांनी राग जोगकंसने मैफलीला सुरुवात केली. त्यानंतर ‘सुघर बरपया नीके वनीके’ यांसह विलंबित एकताल, छोटा खयाल पीर पराइ, मध्यलय तिनतालातील शास्त्रीय रचनांचे सादरीकरण झाले. त्यांना श्रीकांत पिसे, आशय कुळकर्णी आणि निधी रानडे आणि वर्षिता बंसिवाल यांनी उत्तम साथसंगत केली. पं. गोपाळराव वाडेगांवकर यांचे तबलावादनाबरोबरच गायन क्षेत्रातही मोठे योगदान होते. त्यांच्यासोबत मैफलींमध्ये वादन करण्याचा योग आला, ही आपल्यासाठी समाधानाची बाब असल्याचे डॉ. साधना शिलेदार यांनी सांगितले.