बालाकोट ते ‘ऑपरेशन सिंदूर’

मन की बात’मध्ये PM मोदींनी सांगितली दहशतवादाविरोधातील भूमिका

    दिनांक :27-Sep-2026
Total Views |
नवी दिल्ली,
PM Modi's Mann Ki Baat पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’च्या 138व्या भागातून देशवासीयांशी संवाद साधताना 2016 मध्ये झालेल्या सर्जिकल स्ट्राइकचा उल्लेख केला. सर्जिकल स्ट्राइकला 10 वर्षे पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी 28-29 सप्टेंबर 2016 च्या रात्री भारतीय लष्कराने पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांवर केलेल्या कारवाईची आठवण सांगितली. नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय जवानांनी केलेल्या या कारवाईने दहशतवादाविरोधातील भारताच्या धोरणाकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले, असे मोदी यांनी म्हटले. दहशतवादी हल्ल्यांमुळे देशाने दीर्घकाळ सहन केलेल्या वेदनेला सर्जिकल स्ट्राइक हे निर्णायक प्रत्युत्तर असल्याचेही त्यांनी नमूद केले.
 
 
 
bala
 
गेल्या दशकातील भारताच्या दहशतवादविरोधी कारवाईचा संदर्भ देताना पंतप्रधान मोदी यांनी बालाकोट एअर स्ट्राइकपासून ‘ऑपरेशन सिंदूर’पर्यंतच्या घटनांचा उल्लेख केला. दहशतवाद्यांकडून भारतावर हल्ला झाल्यास त्याला प्रत्युत्तर दिले जाईल, असा संदेश या कारवायांमधून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मोदी यांनी देशातील दहशतवादी हल्ल्यांच्या जुन्या घटनांचाही उल्लेख केला. 13 सप्टेंबर 2008 रोजी दिल्लीत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर काही आठवड्यांनी मुंबईत 26/11 चा मोठा दहशतवादी हल्ला झाला, अशी आठवण त्यांनी करून दिली.
 
 
पंतप्रधान मोदी यांनी पूर्वीच्या काळातील दहशतवादी हल्ल्यांनंतर पाकिस्तानविरोधात कारवाईची मागणी होत असल्याचे सांगत त्यावेळी निर्णय लांबणीवर पडत असल्याचा संदर्भ दिला. आता भारताने दहशतवादाविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ची भूमिका स्वीकारली असून त्याचे परिणामही दिसत असल्याचे त्यांनी ‘मन की बात’मध्ये म्हटले. सर्जिकल स्ट्राइकच्या 10व्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी या कारवाईचा उल्लेख करत भारताच्या दहशतवादविरोधी धोरणातील बदल अधोरेखित केला.