नागपूर,
PMAY nagpurनागपूर शहरालगत असलेल्या प्रधानमंत्री आवास योजना, तरोडी खु. परिसरात सध्या अस्वच्छता, तुटलेली गटारे, रस्त्यावर वाहणारे सांडपाणी आणि उघडे खड्डे यामुळे नागरिकांच्या जीवित व आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना अक्षरशः नरकयातना सहन कराव्या लागत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
परिसरातील गटारे तुटलेली असून अनेक दिवसांपासून सांडपाणी वाहत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. हे सांडपाणी थेट रस्त्यावर येत असल्याने ठिकठिकाणी दुर्गंधी, चिखल आणि घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. साचलेल्या पाण्यात किडे आणि अळ्या आढळत असून डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांमध्ये आजारांची भीती निर्माण झाली आहे. काही नागरिकांनी डेंग्यू तसेच इतर तापजन्य आजारांच्या तक्रारी केल्याचेही सांगितले.
नगरपंचायत की ग्रामपंचायत? नागरिकांची फरफट सुरूच!
या परिसरातील समस्यांची जबाबदारी नेमकी कोणाची, यावरून नागरिकांना नगरपंचायत आणि ग्रामपंचायतच्या फेऱ्या माराव्या लागत असल्याची तक्रार आहे. मात्र, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असतानाही जबाबदारी निश्चित करून तातडीने उपाययोजना करण्याऐवजी प्रशासनाकडून चालढकल होत असल्याचा आरोप होत आहे.
पावसाळ्यात रस्ते खोदून ठेवण्यात आल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. परिणामी चिखल, दुर्गंधी आणि डासांचा त्रास वाढला आहे. रात्रीच्या वेळी या भागातून जाताना अपघात होण्याचा धोका असल्याचेही नागरिकांनी सांगितले.
सात-आठ फुटांचे खड्डे; लहान मुलांच्या जीवाला धोका
नवीन पाइपलाइन टाकण्यासाठी कंत्राटदाराने परिसरात तब्बल सात ते आठ फूट खोल खड्डे खोदून ठेवले असल्याची नागरिकांची तक्रार आहे. हे खड्डे पुरेशा सुरक्षाव्यवस्थेशिवाय उघडे असल्याने लहान मुले किंवा पादचारी त्यात पडून गंभीर दुर्घटना होण्याची शक्यता आहे.
दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. काम सुरू करण्यापूर्वी आणि काम सुरू असताना नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक बॅरिकेडिंग, चेतावणी फलक व प्रकाशव्यवस्था असणे गरजेचे असल्याची मागणी होत आहे.
आरोग्यासाठीची ‘ग्रीन जिम’च बनली धोकादायक!
नागरिकांच्या आरोग्यासाठी उभारण्यात आलेली ग्रीन जिम सध्या स्वतःच प्रशासनाच्या दुर्लक्षाची साक्ष देत आहे. ग्रीन जिममधील साहित्य तुटलेले असून परिसरात मोठ्या प्रमाणात झाडी-झुडपे वाढली आहेत. जिमच्या परिसरात अस्वच्छता पसरल्याने नागरिकांना व्यायाम करण्याऐवजी जीवित सुरक्षेची चिंता करावी लागत आहे.
झाडी-झुडपांमुळे साप, विंचू किंवा इतर विषारी जीवांचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे ‘ग्रीन जिम आरोग्यासाठी की आरोग्य धोक्यात आणण्यासाठी?’ असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
पालकमंत्र्यांच्या विधानसभा मतदारसंघातच विकासकामांची ही अवस्था?
विशेष म्हणजे हा परिसर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामठी विधानसभा मतदारसंघाच्या हद्दीत येतो. त्यामुळे त्यांच्या मतदारसंघातील नागरिकांना मूलभूत सुविधा आणि सुरक्षित रस्त्यांसाठी अशी वणवण करावी लागत असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नागरिकांनी प्रशासनाने तातडीने सांडपाण्याचा निचरा करावा, तुटलेली गटारे दुरुस्त करावीत, रस्त्यांची डागडुजी करावी, उघडे खड्डे सुरक्षित करावेत आणि ग्रीन जिम परिसरातील झाडी-झुडपे साफ करून व्यायामाची साधने दुरुस्त करावीत, अशी मागणी केली आहे.
“आता तरी प्रशासनाने जागे व्हावे; अन्यथा नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करतील,” असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.