सणासुदीच्या काळात महागाईचा फटका बसणार!

    दिनांक :27-Sep-2026
Total Views |
नवी दिल्ली,
price-hikeसणासुदीच्या दिवसांपूर्वी देशात एअर कंडिशनर, एलईडी टीव्ही, वॉशिंग मशीन आणि इतर ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स वस्तू महाग होऊ शकतात. तांबे आणि स्टीलसारख्या कच्च्या मालाच्या किमतीतील वाढ लक्षात घेता, प्रमुख ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स कंपन्या आपल्या उत्पादनांच्या किमती पाच ते आठ टक्क्यांनी वाढवण्याच्या तयारीत आहेत. कंपन्यांच्या मते, तांबे, ॲल्युमिनियम, स्टील, प्लास्टिक आणि कच्च्या तेलाशी संबंधित उत्पादनांच्या वाढत्या किमती, तसेच मालवाहतुकीचा खर्च आणि परकीय चलनातील चढ-उतार यामुळे ही दरवाढ आवश्यक झाली आहे. यावर्षी ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांकडून दरवाढ होण्याची ही तिसरी वेळ असेल.
 
app
 
एअर कंडिशनरच्या किमती सुमारे पाच ते आठ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता असताना, काही कंपन्या वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर आणि एलईडी टीव्हीच्या किमती तीन ते चार टक्क्यांनी वाढवणार आहेत. तथापि, काही कंपन्या अजूनही परिस्थितीचा आढावा घेत आहेत. अनेक कंपन्यांना वाटते की, या दरवाढीचा मागणीवर परिणाम होऊ शकतो. तर काहींच्या मते, दरवाढीचा परिणाम मर्यादित असेल, कारण डीलर्स आणि वितरकांकडे जुन्या किमतीत आधीच मालसाठा उपलब्ध आहे. ब्लू स्टार, गोदरेज अप्लायन्सेस, हायर, डायकिन आणि सुपर प्लास्ट्रॉनिक्ससह अनेक कंपन्यांनी विविध श्रेणींमध्ये आधीच दरवाढीची घोषणा केली आहे.
 
 
गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपचे व्यवसाय प्रमुख आणि कार्यकारी उपाध्यक्ष कमल नंदी म्हणाले की, मागील दर आढाव्यापासून वस्तूंच्या किमती आठ ते दहा टक्क्यांनी वाढल्या आहेत. परिणामी, विविध श्रेणींमध्ये पाच ते सात टक्क्यांची दरवाढ अटळ आहे. मात्र, त्यांनी पुढे सांगितले की, जुन्या किमतीत खरेदी केलेला माल बाजारात सुमारे एक ते दीड महिना उपलब्ध राहू शकतो.