लखनऊ,
rain-havoc-in-up-15-dead उत्तर प्रदेशात गेल्या ४८ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाशी संबंधित विविध घटनांमध्ये राज्यभरात १५ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. अतिवृष्टीचा फटका जनावरांना तसेच शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांनाही बसला आहे. परिस्थितीचा आढावा घेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्देशानुसार प्रशासनाने मदत आणि बचावकार्याला वेग दिला आहे.
पावसामुळे जीवितहानी झालेल्या कुटुंबांसह जखमी आणि पशुधनाचे नुकसान झालेल्यांना २४ तासांच्या आत नियमानुसार आर्थिक मदत देण्याचे निर्देश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी बाधित कुटुंबे आणि मृतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. प्रशासनाकडून बाधित नागरिकांपर्यंत शक्य तितक्या लवकर मदत पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या भागांमध्ये मदत व बचाव पथके तैनात करण्यात आली आहेत. पूरग्रस्त परिसरातील कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवून मदत शिबिरांमध्ये नेले जात आहे. या शिबिरांमध्ये नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. बाधित भागांवर सातत्याने लक्ष ठेवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
दरम्यान, मुसळधार पावसाचा मोठा फटका शेतीला बसला आहे. भात, ऊस आणि भाजीपाला या उभ्या पिकांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे प्रत्यक्ष पाहणीद्वारे मूल्यांकन करण्याचे काम सुरू असून, अहवालाच्या आधारे नियमांनुसार मदत आणि नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मदत व बचाव कार्यात कोणतीही हलगर्जीपणा होऊ नये आणि गरजू नागरिकांना तातडीने मदत मिळावी, अशा स्पष्ट सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.